दोष सर्वांचा, पण सुरुवात माझ्यापासून!;SAविरुद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरचे राजीनाम्यावर मोठे विधान!
India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशा फरकाने जिंकली आहे. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा 408 धावांनी दारूण पराभव झाला.
549 धावांचे आव्हान गाठताना भारतीय संघ केवळ 140 धावांवर गारद झाला. धावांच्या फरकाचा विचार करता, हा भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा पराभव आहे. या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने तब्बल २५ वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे.
भारताला मायदेशात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत 'व्हाईटवॉश'ला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडकडून 3-0 ने पराभव झाल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही 0-2 ने हरवले आहे.

गंभीर टीकेनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरची प्रतिक्रिया
दुसऱ्या गुवाहाटी कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यावर सोशल मीडियावर मोठी टीका सुरू झाली आहे. गंभीर यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीचा आलेख घसरला आहे. त्यामुळे, गंभीर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सामना संपल्यानंतर गौतम गंभीर यांनी राजीनाम्याच्या मागणीवर मोठे विधान केले.
गौतम गंभीर राजीनाम्यावर काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या दारूण पराभवाची संपूर्ण जबाबदारी गौतम गंभीर यांनी स्वीकारली आहे. ते म्हणाले: "दोष सर्वांचा आहे, पण जबाबदारीची सुरुवात माझ्यापासून करा." गंभीर यांनी आपल्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल असे स्पष्ट केले. तसेच, आपल्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात मिळालेल्या यशाची आठवण करून दिली.
"इंग्लंडमध्येही माझ्या मार्गदर्शनाखाली चांगला खेळ केला. तसेच माझ्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषक ही स्पर्धा जिंकली हेही लक्षात ठेवा," असे गौतम गंभीर यांनी सांगितले.
गौतम गंभीरच्या काळात टीम इंडियाची 'गंभीर' परिस्थिती
गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाच्या काळात भारतीय संघाच्या नावे अनेक नकोसे विक्रम नोंदवले गेले आहेत, जे संघाची 'गंभीर' परिस्थिती दर्शवतात:
- २५ वर्षांनी भारताला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका गमवावी लागली.
- ३६ वर्षांनी भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पराभवाचा धक्का.
- कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून मालिका गमवावी लागली (३-० ने क्लीन स्वीप).
- कसोटीमध्ये पहिल्यांदाच घरच्या मैदानावर 3-0 ने क्लीन स्वीप.
- १२ वर्षांनी भारताला घरच्या कसोटी मालिकेत आणि मुंबईच्या वानखेडेवर कसोटीत पराभव स्वीकारावा लागला.
- पहिल्यांदाच टीम इंडिया WTC फायनलसाठी क्वालिफाय करू शकली नाही.
- लीड्सवर ५ शतके करूनही कसोटी हरलेली जगातील पहिली टीम.
गौतम गंभीर यांनी जबाबदारी स्वीकारली असली तरी, बीसीसीआय त्यांच्या भवितव्याबद्दल कोणता निर्णय घेते, याकडे आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications