BCCI चा करार : रोहित- विराटला कोट्यवधींचा झटका? 'या' 3 खेळाडूंची बल्ले-बल्ले, वाचा काय झाले?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळा म्हणजेच BCCI ने याच आठवड्यात महिला क्रिकेट संघाचे वार्षिक केंद्रीय करार जाहीर केले. आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या केंद्रीय करारांची यादीही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याआधी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचे ग्रेड घसरण्याची व त्यांना कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय पहिल्यांदाच काही नवीन खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

कधी जाहीर होणार केंद्रीय करार?
यावेळी बीसीसीआयचे निवडकर्ते केंद्रीय करारात अनेक बदल करू शकतात, असे वृत्त आहे. जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या संभाव्य संघावर चर्चा करण्यासाठी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआय सचिव देवजित सैकिया २९ मार्च रोजी गुवाहाटी येथे भेटणार आहेत. या बैठकीत पुरुष संघासाठी केंद्रीय करार अंतिम होण्याची शक्यता आहे.
रोहित-विराटचे डिमोशन?
केंद्रीय करारात ए प्लस म्हणून तोच खेळाडू राहतो, जो क्रिकेटच्या तिन्ही फाॅर्मेटमध्ये खेळतो. परंतु कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी टी-२० क्रिकेट संघातून निवृत्ती घेतली आहे. रोहित, कोहली आणि जडेजा सध्या A+ श्रेणीत आहेत. त्यामुळे त्यांचे आता डिमोशन होऊन त्यांना अ श्रेणीत स्थान मिळू शकते, असे सांगितले जात आहे.
कर्णधाराची जबाबदारी कुणाकडे?
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारताचा १-३ असा पराभव झाला होता. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर मात्र दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये रोहितने चांगली कामगिरी करत भारताला जेतेपद मिळवून दिले. रोहित वनडेत चांगली कामगिरी करत असला तरी, कसोटीत त्याच्यावर दबाव असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारतीय कसोटी संघाला नवा कर्णधार मिळेल, असेही सांगितले जात आहे.
या खेळाडूंना मिळेल बढती
जसप्रीत बुमराहचा A+ श्रेणीतील केंद्रीय करार कायम राहण्याची खात्री आहे. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिल (अ श्रेणी) याला अव्वल श्रेणीत बढती मिळू शकते. याशिवाय यशस्वी जयस्वाल (ब श्रेणी) याला अ श्रेणीत स्थान मिळू शकते. ब श्रेणीतून अ श्रेणीत बढती मिळवू शकणारा आणखी एक खेळाडू म्हणजे अष्टपैलू अक्षर पटेल असेल असेही सांगितले जात आहे.
या तिघांचे नशीब उजळेल!
नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अभिषेक शर्मा यांना पहिल्यांदाच केंद्रीय करारात समाविष्ट केले जाऊ शकते. त्याला क श्रेणीत स्थान मिळू शकते. ज्यामध्ये क्रिकेटपटूला किमान ३ कसोटी किंवा ८ एकदिवसीय किंवा १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे. ऋतुराज गायकवाड यांना क श्रेणीतील स्थान टिकवून ठेवणे कठीण जाऊ शकते. कारण त्यांनी जुलै २०२४ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.












Click it and Unblock the Notifications