आशिया कप ट्रॉफी वादात नवा ट्विस्ट; ट्रॉफी तात्काळ द्या!, बीसीसीआय नक्वींवर संतापले, दिला 'हा' इशारा
Asia Cup 2025 Trophy Controversy : आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने विजेतेपद पटकावल्यानंतरही ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने निर्माण झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख मोहसीन नक्वी यांना थेट ई-मेल पाठवून आशिया कप ट्रॉफी लवकरात लवकर भारतीय संघाला सोपवण्याची मागणी केली आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली.
सैकिया यांनी स्पष्ट केले की, नक्वी (जे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही आहेत) यांनी जर या मागणीला नकारात्मक प्रतिसाद दिला किंवा उत्तर दिले नाही, तर हा संपूर्ण विषय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) उपस्थित केला जाईल.

ट्रॉफी स्वीकारण्यास नकार का दिला?
भारतीय संघाने २८ सप्टेंबर रोजी आशिया कपच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. मात्र, विजयानंतर भारतीय संघाने एसीसी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने हे कठोर भूमिका घेतली होती.
नक्वी यांचा आग्रह आणि ट्रॉफीची अट
या घटनेनंतर, मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन दुबईतील हॉटेलमध्ये परतले आणि पाकिस्तानला जाण्यापूर्वी त्यांनी ती दुबईतील एसीसी कार्यालयात ठेवली.
नक्वी यांनी नंतर माध्यमांना सांगितले होते की, 'त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही ट्रॉफीला हात लावू शकत नाही.' त्यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला एसीसी कार्यालयात येऊन ट्रॉफी घेऊन जाण्याचा 'सल्ला' दिला होता.
आशिया कपच्या सादरीकरण समारंभात नक्वी यांनी स्वतः ट्रॉफी सादर करण्याचा आग्रह धरला होता. समारंभाचे सूत्रसंचालक सायमन डौल यांनी भारतीय संघ दुसऱ्या एसीसी अधिकाऱ्याकडून पुरस्कार स्वीकारण्यास तयार असल्याची माहिती दिली,
पण नक्वी यांनी स्वतः ट्रॉफी देण्यावर आग्रही राहिले, याच कारणामुळे सादरीकरण समारंभ पूर्ण न होताच थांबवण्यात आला आणि नक्वी ट्रॉफी व पदके घेऊन स्टेजवरून निघून गेले.
'मी कार्टूनसारखा उभा होतो'
या संपूर्ण प्रकरणावरून एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही बीसीसीआयने तीव्र निषेध नोंदवला होता. तेव्हा मोहसीन नक्वी यांनी स्पष्टीकरण दिले होते की, भारतीय संघ ट्रॉफी स्वीकारणार नाही, हे त्यांना कधीही लेखी कळवण्यात आले नव्हते. नक्वी यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले होते, "मी तिथे विनाकारण कार्टूनसारखा उभा होतो."
भारतीय संघाने हस्तांदोलन टाळले!
भारतीय खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले होते, तर पाकिस्तानी खेळाडूंनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या संदर्भात '६-०' असा इशारा वारंवार केला होता, जो पाकिस्तानने सहा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा खोटा दावा पुन्हा सांगत होता. सध्या बीसीसीआयने ट्रॉफी सोपविण्याची थेट मागणी केल्यामुळे, नक्वी यांच्या उत्तराकडे आणि त्यानंतर बीसीसीआय आयसीसीकडे तक्रार करते का, याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications