मोठी बातमी : आशिया कप UAEमध्ये खेळला जाणार; वेळापत्रकही आले समोर; जाणून घ्या कसा रंगणार थरार!
Asia Cup 2025 Update News in Marathi : आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC)आज एक मोठी घोषणा केली आहे. आशिया कप 2025 हा आता युनायटेड अरब अमिरात (UAE) मध्ये खेळवला जाईल. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबर रोजी अंतिम सामन्याने संपेल. वीस दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
ACC चे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष, मोहसिन नक्वी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. "ही एक उत्तम स्पर्धा असेल आणि आपल्याला उत्तम क्रिकेट पाहायला मिळेल," असे नक्वी यांनी म्हटले आहे. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. परंतु, भारत पाकिस्तान यांच्यातील संबंधामुळे हा निर्णय घेतला गेला असल्याचे बोलले जात आहे.

भारताचे यजमानपद तरीही स्पर्धा UAE मध्ये का?
वास्तविक पाहता, २०२५ च्या आशिया कपचे यजमानपद भारताला मिळाले आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.
२०२३ चा आशिया कप पाकिस्तानने आयोजित केला होता. परंतु, भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिल्यानंतर, ती स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती. त्यावेळी भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले गेले होते.
भारत पाकिस्तानमध्ये पहिला सामना कधी रंगणार?
दरम्यान, अहवालात दावा केला जात आहे की दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतील आणि दोघांमधील गट टप्प्यातील पहिली लढत १४ सप्टेंबर रोजी होऊ शकते. एकूणच, जर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले तर दोघेही ३ वेळा एकमेकांसमोर येऊ शकतात. जरी असे झाले नाही तरी दोन्ही संघ २ वेळा एकमेकांसमोर येऊ शकतात. गट टप्प्याव्यतिरिक्त, सुपर-४ मध्ये भारत-पाकिस्तान सामना देखील अपेक्षित आहे.
पहलगाम हल्ल्याचा परिणाम आणि बिघडलेले संबंध
एप्रिलमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ६-७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे दोन्ही देशांमधील राजकीय संबंधात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तान आशिया कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही हे स्पष्ट होते, म्हणूनच ACC ने UAE मध्ये स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
आशिया कपमधील भारताचे वर्चस्व
आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली. आतापर्यंत ही स्पर्धा १६ वेळा खेळली गेली आहे. यामध्ये भारताने सर्वाधिक, म्हणजेच ८ वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. श्रीलंकेने ६ वेळा, तर पाकिस्तानने २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि द्विपक्षीय मालिकांचे भवितव्य
या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही भारतीय संघ पाकिस्तानला गेला नव्हता. भारताचे सर्व सामने UAE मध्येच खेळले गेले होते, इतकेच नाही तर एक सेमीफायनल आणि फायनल देखील UAE मध्येच झाला होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने विजेतेपद पटकावले होते.
२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय क्रिकेट मालिका पूर्णपणे थांबल्या आहेत. आता हे दोन्ही संघ फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आयोजित स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात. यामुळे जेव्हा जेव्हा भारत-पाकिस्तान सामना असतो, तेव्हा जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतात. या सामन्यांतून आयोजक आणि प्रसारक प्रचंड कमाई करतात. त्यामुळे, जरी राजकीय तणाव कायम असला तरी, या दोन क्रिकेट दिग्गजांमधील सामना महत्त्वाचा ठरतो.












Click it and Unblock the Notifications