"तिचा चेहरा सतत डोळ्यांसमोर यायचा", आकाश दीपने 'या' व्यक्तीसाठी लढून लिहिला ऐतिहासिक विजयाचा अध्याय
एजबेस्टनच्या मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने इतिहास घडवला. तब्बल 58 वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर भारतीय संघाने टेस्ट सामन्यात दणदणीत विजय मिळवला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लिश संघाचा पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र या विजयामागे एक भावनिक संघर्षही दडलेला होता तो होता युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपचा.

या सामन्यात एकूण 10 बळी घेणाऱ्या आकाश दीपने सामन्यानंतर आपल्या आयुष्यातील अत्यंत खाजगी आणि भावनिक बाब समोर ठेवली. त्याच्या बहिणीला कॅन्सर आहे, आणि ही संपूर्ण कामगिरी त्याने तिच्यासाठी समर्पित केली असल्याचं त्याने सांगितलं.
बहिणीच्या लढ्यामुळे मनोबल वाढलं
चेतेश्वर पुजारासोबत दिलेल्या एका विशेष मुलाखतीत आकाश दीपने सांगितलं, "गेल्या दोन महिन्यांपासून माझी बहीण कॅन्सरशी लढते आहे. मी हे अजून कोणालाच सांगितलं नव्हतं. या विजयाचं सर्वस्व मी तिला अर्पण करतो. मैदानावर असताना तिचाच चेहरा सतत डोळ्यांसमोर यायचा. मी तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलवायचं ठरवलं होतं."
आकाश पुढे म्हणतो, "सध्या तिची तब्येत थोडी स्थिर आहे. माझ्या कामगिरीने ती सर्वाधिक आनंदी असेल. गेल्या काही आठवड्यांत तिने खूप मानसिक तणाव झेलला आहे. जेव्हा मी बॉल हातात घ्यायचो, तेव्हा तिचाच विचार मनात यायचा. त्यामुळे हा विजय माझ्यासाठी नाही, तिच्यासाठी आहे."
इंग्लंडमध्ये विक्रम करणारा दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज
6 जुलै रोजी संपलेल्या या एजबेस्टन टेस्टच्या शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला केवळ 271 धावांत गुंडाळलं. भारताने 336 धावांनी सामना जिंकला. आकाश दीपने दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या, तर पहिल्या डावात 4 विकेट्स घेत त्याने एकूण 10 बळींची कामगिरी केली. या जबरदस्त प्रदर्शनामुळे तो इंग्लंडमध्ये एका टेस्ट सामन्यात 10 विकेट्स घेणारा केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
एक प्रेरणादायी विजय
या विजयामागे फक्त खेळातील कौशल्य नव्हतं, तर भावनांचा महासागर होता. आपल्या बहिणीच्या आजाराशी सुरू असलेल्या संघर्षातही आकाश दीपने मैदानात आपली शंभर टक्के ताकद दिली. त्याची ही कामगिरी क्रिकेटप्रेमींसाठी जितकी कौतुकास्पद आहे, तितकीच ती भावनिकदृष्ट्याही स्पर्श करणारी आहे.












Click it and Unblock the Notifications