12 ZP, 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाचा उत्साह; पण वादाची सावली; कुठे हाणामारी तर कुठे बहिष्कार!
Zilla Parishad-Panchayat Samiti Elections 2026 : राज्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. छत्रपती संभाजीनगरपासून ते थेट सिंधुदुर्गापर्यंत लोकशाहीचा हा उत्सव सुरू असतानाच अनेक ठिकाणी तणाव, बोगस मतदान आणि मतदानावर बहिष्काराच्या घटना समोर आल्या आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकीचे रणमैदान
अजित पवार यांच्या निधनामुळे लांबणीवर पडलेले हे मतदान आज ७.३० वाजता सुरू झाले.
मतदानाची व्याप्ती: एकूण १२ जिल्ह्यांत २५,४७१ केंद्रांवर २ कोटींहून अधिक मतदार ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य ठरवत आहेत.
दोन ईव्हीएम: मतदारांना जिल्हा परिषदेसाठी पांढऱ्या रंगाच्या, तर पंचायत समितीसाठी गुलाबी रंगाच्या ईव्हीएमवर मतदान करावे लागत आहे.
संभाजीनगर: बोगस मतदानाचा आरोप अन् नावे गायब
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या उत्साहापेक्षा वादाचेच वर्चस्व दिसून आले. वाळूज परिसरात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान होत असल्याचा खळबळजनक आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. सिल्लोड तालुक्यातील अंभई गटात अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत, तर काहींची नावे दुसऱ्या गावात वळवण्यात आल्याने मतदारांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला.
'रस्ता नाही तर मतदान नाही'; परभणीत हृदयद्रावक बहिष्कार
परभणीच्या सेलू तालुक्यातील बोथ व बोथतांडा ग्रामस्थांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला.
दुर्दैवी घटना: मागील आठवड्यात रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेचे बाळ रस्त्यातच दगावले. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी 'ईश्वर साक्ष शपथ' घेऊन मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने मनधरणी करूनही ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
पाथरीत हाणामारी; चाकू लागल्याने कार्यकर्ता जखमी
परभणीच्या पाथरी तालुक्यातील गुलशन नगर केंद्रावर राजकारणाचे हिंसक रूप पाहायला मिळाले. काँग्रेस विरुद्ध शिंदे शिवसेनेच्या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात चाकूचा वापर झाला. यामध्ये शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता वसीम शेख गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी परभणीला हलवण्यात आले आहे. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
तांत्रिक बिघाड आणि बोगस मतदार
चिपळूण: नाचरेवाडी केंद्रावर ईव्हीएम मशिन बंद पडल्याने मतदानाची प्रक्रिया काही काळ थांबवावी लागली.
पुणे (चाकण-रांजणगाव): चाकणमधून काही तरुण रांजणगाव गणपती येथे बोगस मतदानासाठी आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या तरुणांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.
सांगली: तासगावच्या बलगवडे गावात सोलर प्रकल्पासाठी झालेल्या १०-१५ हजार वृक्षतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही.
खासदार ओमराजे निंबाळकरांचा 'विजयी मंत्र'
धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी ईव्हीएमवर अविश्वास दाखवणाऱ्यांना सल्ला दिला की, "निवडणूक मशिनवरच लढायची असेल तर त्यावर विश्वास ठेवायला हवा." पोलिंग एजंटांनी केवळ सील आणि मशिनची तपासणी नीट करावी, असे त्यांनी सुचवले.












Click it and Unblock the Notifications