एकनाथ शिंदे यांनी बंड का केले? सततचा अपमान, हस्तक्षेप ठरला कारणीभूत
Shivsena Leader Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले कट्टर शिवसैनिक. आनंद दिघे यांच्या नुसत्या शब्दाखातर एकनाथ शिंदे यांनी अनेक आंदोलने केली. बेळगाव सीमा प्रश्नाच्या आंदोलनात तर एकनाथ शिंदे अनेक दिवस बेल्लारीच्या कारागृहात होते. ठाणे शहरात डान्सबार विरोधातील त्यांचे आंदोलन खूप गाजले.
आनंद दिघे यांचा मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांनीच ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा सांभाळ गेला आणि ठाणे शहरावरील शिवसेनेचा भगवा उतरू नये यासाठी प्रयत्न केले. प्रसंगी शिवसेनेचे शत्रु असलेल्या मनसेशी वाटाघाटी करून ठाणे महापालिकेत त्यांचा पाठिंबा मिळविला. ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर परिसरातही शिवसेनेचा विस्तार करण्यात एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची होती. आनंद दिघे यांचा मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशीही एकनाथ शिंदे यांचे खूप चांगले संबंध राहिले.

उपमुख्यमंत्रीपद हुकले
2004 आणि 2009 साली एकनाथ शिंदे विधानसभेवर निवडून गेले. पण दोन्ही वेळेस युतीची सत्ता आली नाही. 2014 साली शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले. राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि शिवसेनेवर विरोधात बसण्याची वेळ आली. त्या काळात एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होते. राष्ट्रवादीचा सरकारला बाहेरून पाठिंबा असल्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पावर कमी झाली आणि तगडी खाती पदरात पाडून घेण्यात शिवसेनेला अपयश आले.
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री पद मिळेल अशी चर्चा त्या काळात होती पण ती सफल झाली नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद त्यांना देण्यात आले. आणि एम एम आर डी ए ची जबाबदारी ही त्यांच्याकडे आली. मंत्रीपदाच्या या काळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध निर्माण झाले. त्यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर समृद्धी महामार्गाची जबाबदारी सोपवली आणि एकनाथ शिंदे यांनी ती पूर्ण केली. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या मराठवाड्यातील आमदारांच्या खूप जवळ गेले.
हळूहळू प्रस्थ वाढले
या काळात राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही पक्षांचा संघर्ष होता.शिवसेनेचे अनेक मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत भाजपच्या मंत्र्यांवर आगपाखड करीत असत.पण एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सरकारवर टीका करण्याचे कटाक्षाने टाळले.समृद्धी महामार्गावर सामनातून जोरदार हल्ला चढविण्यात आला असला तरी शिंदे यांनी ती जबाबदारी व्यवस्थित सांभाळली.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासींचा मोर्चा ठाण्याच्या वाटेवर थांबवून त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. या काळात पक्षात शिंदे यांचे प्रस्थ वाढत होते तर उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करून प्रत्यक्षात सत्तेचे फायदे घेण्यात मश्गुल होते.
मुख्यमंत्रीपदासाठी नेतृत्वाचाच विरोध
2019 साली शिवसेना भाजपा युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले.वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आणि शिंदे यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाला.आदित्य ठाकरे यांची सीट सुरक्षित करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना शिवसेनेत घेण्यात आले. आणि वरळीची लढत सोपी करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजपला कौल दिला असला तरी उद्धव ठाकरे यांनी आयत्यावेळी भाजपला टांग दिली आणि मुख्यमंत्रीपदासाठी ते अडून बसले.
नैसर्गिक युती तुटली आणि अनैसर्गिक महाविकास आघाडीची चाहूल महाराष्ट्राला लागली.त्या काळात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. पण शरद पवारांच्या काठीने एकनाथ शिंदे यांचा साप बाजूला सारण्यात आला.प्रत्यक्षात शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला महाविकास आघाडीच्या अन्य पक्षांच्या नेत्यांकडून नव्हे तर उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचे नंतर स्पष्ट झाले.मुख्यमंत्रीपदाचा सर्वात प्रबळ दावेदार असूनही शिंदे यांच्या नावाऐवजी नंतर रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची नावे पुढे आली. पण या नावावर मात्र घटक पक्षांनी काट मारली आणि शेवटी उद्धव ठाकरे यांचे नाव अंतिम झाले.
निवडून आलेले आमदार सत्तेबाहेर
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अत्यंत चलाखीने खेळ करून अपक्षांच्या वाट्याची मंत्रिपदे शिवसेनेच्या गळ्यात घातली. त्यातच उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी आदित्य ठाकरे यांना देखील कॅबिनेट मंत्री केले. प्रत्यक्ष लोकांतून निवडून आलेले सुभाष देसाई आणि अनिल परब यांनाही मंत्री करण्यात आले. अशी सात मंत्री पदे शिवसेनेने म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी वापरली. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांना फारशी संधीच मिळाली नाही. एकनाथ शिंदे यांना झालेली ती दुसरी जखम होती.मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे पक्ष संघटनेकडे सपशेल दुर्लक्ष झाले. स्वतःच्या आमदारांना भेटण्यासही उद्धव ठाकरे टाळाटाळ करीत होते त्यामुळे नाराज झालेले आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ लागले आणि या आमदारांचे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध घट्ट होत गेले.
स्थानिक शिवसैनिकांची गळचेपी
उद्धव ठाकरे यांना कोणताही प्रशासकीय अनुभव नव्हता.आणि राष्ट्रवादीचे तसेच काँग्रेसचे नेते प्रशासन कोळून प्यालेले होते. त्यामुळे प्रशासनाचा वापर करून ग्रामीण भागातील शिवसैनिकांची गळचेपी करण्याचे धोरण काँग्रेस राष्ट्रवादीने आखले. उद्धव ठाकरे यांना त्याची कल्पनाही नव्हती.त्यामुळे दुखावलेले शिवसैनिक आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात येत गेले.
महाविकास आघाडीत आपले काही खरे नाही आणि मुख्यमंत्रीपदामुळे महाविकास आघाडीच्या दबावाखाली असलेले उद्धव ठाकरे आपल्याकडे लक्ष देणार नाहीत अशी भावना पक्ष संघटनेत दृढ होऊ लागली.त्यातच हिंदुत्ववादी मतदार दुरावण्याची आणि भाजपचा स्थानिक पातळीवर रोष पत्करावा लागण्याची भीती आमदारांना होतील.आम्ही लढून आलो आहोत, आमचे मतदार संघ वरळी प्रमाणे सुरक्षित नाहीत आणि आम्हाला विधानपरिषदही मिळणार नाही मग महाविकास आघाडीच्या गणिताचा काय फायदा, असा धोषा आमदारांनी एकनाथ यांच्याकडे लावला होता.
पंख छाटण्यास सुरुवात
संघटनेत एकनाथ शिंदे यांना मानणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे हे लक्षात येतात शिंदे यांच्या अधिकारांवर गदा आणण्यास सुरुवात झाली. त्यांच्या मंत्रालयातील फाईल्स मुख्यमंत्री स्वतः बारकाईने तपासू लागले. एकनाथ शिंदे यांच्या विभागाच्या बैठका त्यांच्या गैरहजेरीत आदित्य ठाकरे घेऊ लागले. महत्त्वाच्या बैठकांना एकनाथ शिंदे यांना बाहेर बसविण्यात येऊ लागले. वरुण सरदेसाई यांचा हस्तक्षेपही एकनाथ शिंदे यांच्या खात्यात वाढू लागला. त्यामुळे शिंदे यांच्या मनात खदखद निर्माण झाली होती. एवढा अपमान सोसूनही शिंदे बराच काळ गप्प होते.
2022 मध्ये राज्यसभेची निवडणूक झाली. विरोधी बाकावर बसलेल्या भाजपने क्षमता आणि शक्यता नसतानाही अधिकचा उमेदवार दिला आणि तो निवडून सुद्धा आणला. शिवसेनेचा उमेदवार मात्र पराभूत झाला. "नाराज असलो तरी या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला तीन मते आपण बाहेरून आणून दिली" असे शिंदे यांनी सभागृहातच स्पष्ट केले होते. या निवडणुकीच्या निकालानंतर पक्ष नेतृत्वाची शिंदे यांच्यावरील नाराजी वाढली.
राज्यसभा निवडणुकीत तोंड पोळलेल्या शिवसेनेने नंतर एकनाथ शिंदे यांना कुठल्याही धोरणात्मक निर्णयात सहभागी करून घेतले नाही. "आईच दूध विकणारी अवलाद आमच्या पक्षात नकोच" अशी टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापना दिली आयोजित कार्यक्रमात केली.
विधान परिषद निवडणूक तेव्हा तोंडावर होती. विधान परिषद निवडणुकीत सुद्धा प्रत्यक्ष रणनीती आखण्याच्या दिवशी एकनाथ शिंदे यांना बाहेर ठेवण्यात आले आणि त्यांच्या संतापाचा स्फोट झाला. पुढे जे काही घडले तो इतिहास आहे. निवडणुकीचे मतदान झाले. भाजपचा अधिकचा उमेदवार निवडून आला. आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा मात्र पराभव झाला.पक्षात सातत्याने होणारा अपमान, पक्षप्रमुखांच्या कुटुंबीयांचा कारभारात हस्तक्षेप, पक्षात पंख छाटण्याचे सातत्याने होणारे प्रयत्न आणि संघटनेकडे नेतृत्वाचे झालेले दुर्लक्ष तसेच सहकारी आमदारांचा दबाव यामुळेच एकनाथ शिंदे यांना बंड करणे भाग पडले.












Click it and Unblock the Notifications