धमकीमुळे प्रसिद्ध झालेले आ. सुहास कांदे आहेत तरी कोण? संपत्ती किती? गुन्हे किती? वाचा संपूर्ण स्टोरी
Suhas Kande vs Bhujbal- समीर भुजबळांना धमकी दिल्याच्या बातम्या आल्यानंतर, महाराष्ट्रात आ. सुहास कांदे पुन्हा चर्चेत आले. गेल्या १० वर्षांपासून छगन भुजबळांना त्यांच्याच जिल्ह्यात नडणारा नेता म्हणून, आ. सुहास कांदे ओळखले जातात. कांदे हे अगोदर भुजबळांसोबतच होते. मात्र शिवसेनेत प्रवेश केल्यावर ते भुजबळांचे कट्टर विरोधक झाले. आ.कांदे यांनी त्यांची राजकीय कारकीर्द मनसेतून सुरु केली. त्यांनंतर ते तोडफोडीच्या राजकारणासाठी ओळखले जाऊ लागले. याच सुहास कांदे यांच्याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत...

कशी आहे सुहास कांदे यांची कारकिर्द?
सुहास कांदे मूळचे निफाड तालुक्यातले आहेत. मनसे स्थापन झाल्यानंतर २००६ साली त्यांनी मनसेतूनच राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे २००८ ला त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. स्वतः वंजारी समाजातील असल्याने वंजारी मतदार जास्त असलेल्या नांदगाव मतदारसंघात त्यांनी एंट्री केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळ यांना विजयी करण्यासाठी त्यांनी मदत केली होती. मात्र त्यानंतर छगन भुजबळांसोबत वाद झाल्यानंतर या दोघांत जास्त दुश्मनी झाली. या पाच वर्षांत आ. कांदे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि पंकज भुजबळांविरोधात निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. या पाच वर्षांत त्यांचं मातोश्रीवरही चांगलं वजन वाढलं. त्यानंतर २०१९ ला त्यांनी पुन्हा विधानसभा लढवली आणि पंकज भुजबळांचा पराभव केला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर आ. कांदे एकनाथ शिंदेंसोबत गेले.
भुजबळ, आदित्य ठाकरेंनाही नडले
भुजबळांशी हाडवैर असलेले आ. कांदे शिवसेना फुटल्यावर शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर त्यांचं ठाकरे गटासोबतही चांगलंच वाजलं. सुहास कांदे आदित्य ठाकरेंनाही नडलेत. शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंना माझं काय चुकलं म्हणत खडे सवाल केले होते. एकेकाळी संजय राऊतांच्याही जवळ असणारे सुहास कांदे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आले, लोकांमध्ये मिसळले आणि आमदार झाले. शिंदे गटात जाऊन मातोश्रीला सवाल करणाऱ्या सुहास कांदेंना तोडफोड करणारा नेता म्हणूनही ओळखले जाते.
किती आहे संपत्ती?
२०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ही सव्वा अकरा कोटींपेक्षा जास्त होती. यावेळी ती वाढली आहे. आमदार असण्याबरोबत सुहास कांदे हे व्यावसायिक असून त्या माध्यमातूनच त्यांनी ही संपत्ती कमवली असल्याचे सांगितले आहे. सुहास कांदे हे आक्रमक राजकारणी असून यावेळी तिरंगी लढतीमुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
दाखल आहेत अनेक गुन्हे
२०१९ च्या शपथपत्रात आ. कांदे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. २०१४ ला त्यांच्यावर तडीपारीची कारवाईही झाली होती. खंडणी, फसवणूक, आत्महत्येचा प्रयत्न असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. सुहास कांदेंविरोधातल्या अनेक प्रलंबित केसेस आहेत. सुहास कांदेंचं राजकारण हे सत्तेत असलेल्या भुजबळांसोबतच्या संघर्षामुळे चांगलंच गाजलं. सुहास कांदेंवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांच्यावर तडीपारीसारखी कारवाई सुद्धा झाली. सुहास कांदे शिवसेनेचे आमदार असले तरी सध्या ते वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहेत. मतदानाच्या दिवशी त्यांनी थेट समीर भुजबळांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे बोलले गेले.












Click it and Unblock the Notifications