शिवसेना फुटीचा फायदा कुणाला? उद्धव ठाकरेंनी साथ सोडल्याने भाजपने काय गमावले काय कमावले, वाचा...
Shiv Sena split Uddhav Thackeray's departure is BJP's gain or loss:"मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की" ... 28 नोव्हेंबर 2019 शिवाजी पार्कवर हा आवाज देशानं ऐकला. उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातले पहिले मुख्यमंत्री ठरले. या मुख्यमंत्री पदासाठी आणि नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात असंख्य घडामोडी घडल्या. त्या अजूनही थांबायला तयार नाहीत. त्यामुळंच मागील 50 वर्षांत झाले नाहीत, एवढे राजकीय बदल मागील पाच वर्षांत महाराष्ट्रात झाले. त्यातच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं. भाजपचे राज्यातील खासदार कमी झाले. हा फटका महायुतीत अजित पवार आल्यानं नव्हे तर महायुतीतून उद्धव ठाकरे गेल्यानं भाजपला बसला असं चारच दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे एका मुलाखतीत म्हणाले. खरंच याचा भाजपला फटका बसला का, याचा घेतलेला हा आढावा.

मागील 30 वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर समाजवादी विचारसरणीच्या कॉंग्रेसचं पारडं जड होतं. त्या काळात भाजपकडं साधा बूथ कार्यकर्ताही नव्हता. पण, शिवसेनेकडं स्वतःची अशी कार्यकर्त्यांची फळी होती. उजव्या विचारसरणीचा हा पक्ष हिंदुत्ववादी म्हणून ओळखला जाऊ लागला. भाजपही हिंदुत्ववादी होता आणि आहे. पण, शिवसेनेच्या तुलनेत भाजपचे विचार जरा सौम्य तर शिवसेनेचे विचार जहाल होते.
प्रमोद महाजन, नितीन गडकरी, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे हे त्यावेळी भाजपचे राज्यातील प्रमुख नेते होते. हिंदुत्व या मुद्यांवर भाजप आणि शिवसेनेनेचं एकमत झालं आणि हे दोन्ही पक्ष एकत्र आले. शिवसेनेचं बोट धरून राज्यात भाजपचं राजकारण सुरू झालं. पुढं 1995५ मध्ये राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजपचं सरकार आलं. अर्थात त्यावेळी मोठ्या भावाच्या भूमिकेत शिवसेनाच होती. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आलं.

युती 10 वार्षांपूर्वीच तुटली होती
पुढे अगदी 2014 च्या निवडणुकीआधीही राज्यात युतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ होता. पण, संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांची लाट आली आणि भाजपला केंद्रात सत्ता मिळाली. पक्षाचा जनाधार वाढला. महाराष्ट्रात युतीमध्ये कायम झुकती बाजू घेणार्या भाजपचा आत्मविश्वास वाढला. मोठा भाऊ कोण यावरून धूसफुस झाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीला समोरे गेले.
भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 122 जागा मिळाल्या. शिवसेनेस 63, काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र आले. जागा जास्त असल्यानं आता भाजप मोठा भाऊ झाला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. इथूनच पुढे युतीमध्ये धुसफूस सुरू झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिचा स्फोट झाला आणि युती तुटून नवीन राजकीय समीकरणे अस्तित्वात आली.पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचेही दोन तुकडे झाले.
फायदा कुणाला?
शिवसेनेचा अजेंडा थेट मराठी माणसापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत होता. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपसोबतचा काडीमोड आणि महाविकास आघाडीसोबतची सलगी यामुळे गोष्टी थेट हिंदुत्वापर्यंत पोहोचल्या. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भरकटले आहेत, असे अनेक आरोप झाले. पण लोकसभा निवडणुकीत मात्र, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचीच जादू पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना पाहायला मिळाला. या निवडणुकीत मतदारराजानं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं पाहायला मिळालं. यात महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचा फायदा झाला. महायुतीतील शिंदे गटालाही चांगल्या जागा मिळाल्या.पण, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदरी निराशा आली. भाजपचा जनाधार घटला.
आता विधानसभा निवडणुकीत काय?
आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची चाचपणी सुरू आहे. अशातच शिवसेनेतील बंडानंतरची पहिली निवडणूक असल्यामुळं यंदाच्या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना पाहायला मिळणार यात शंका नाहीच. त्यात दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेससाठीसुद्धा ही लढाई अस्तित्वाची आहे. कॉंग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत. पण, महायुतीत मोठा भाऊ होण्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल. कॉंग्रेस वाट पाहण्याच्या भूमिकेत असणार आहे. थोडक्यात काय तर शिवसेना फुटीचा फायदा कुणाला आणि नुकसान कुणाला हे या निवडणुकीनंतर कळणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा.(Shiv Sena split Uddhav Thackeray's departure is BJP's gain or loss)












Click it and Unblock the Notifications