मुंबईत बस- लोकल- मेट्रो कुठेही करा प्रवास, लागेल फक्त एक 'स्मार्ट कार्ड'; कधी येणार? कसे असणार? वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईकरांसाठी एक मोठी घोषणा केली. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच स्मार्ट कार्ड 'मुंबई १'(Mumbai 1) सुरू केले जाणार आहे. या कार्डद्वारे मेट्रो, मोनो रेल, लोकल ट्रेन आणि बसमध्ये सहज प्रवास करता येऊ शकतो. कार्डची रचना पुढील महिन्यात अंतिम केली जाणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे.

काय असे मुंबई-१ कार्ड?
'मुंबई १' कार्डमुळे लोकांना वेगवेगळी तिकिटे खरेदी करण्याच्या त्रासापासून सुट्टी मिळणार आहे. फडणवीस म्हणाले की, हे कार्ड सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीत उपयुक्त ठरणार आहे. एकाच कार्डने सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येईल. यामुळे वेळ वाचेल आणि प्रवासही सोपा होईल. त्यामुळे येणारे दिवस मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी खूप सोयीस्कर असणार आहेत. लोकांचे जीवनमान अधिक चांगले व्हावे, यासाठी सरकार सतत विकासकामांमध्ये गुंतलेले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
काय म्हणाले रेल्वेमंत्री?
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यासंदर्भात माहिती दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्रात १.७३ लाख कोटींचे पायाभूत सुविधांचे काम हाती घेतले आहे. याशिवाय, यावर्षी २३ हजार ७७८ कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांना मंजुरी देखील देण्यात आली आहे. मुंबई लोकल ट्रेनसाठी २३८ नवीन वातानुकूलित ट्रेनलाही मान्यता देण्यात आली आहे. ज्याचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. एकट्या मुंबईत १७ हजरा कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. यामुळे शहराची रेल्वे व्यवस्था खूप आधुनिक स्वरुपाची असणार आहे.
गोंदिया-बल्हारशाह रेल्वेस मंजुरी
महाराष्ट्रातील २४० किमी लांबीच्या गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण ४,८१९ कोटी रुपये खर्चून पंतप्रधानांनी अलिकडेच मंजूर केले आहे. हा प्रकल्प उत्तर आणि दक्षिण भारतामधील प्रवासी आणि मालवाहतूक जोडणी वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला रेल्वे पायाभूत सुविधांसाठी अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्राला १.७३ लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प देण्यात आले आहेत, ज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षातच राज्याला २३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वाटप करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली.












Click it and Unblock the Notifications