महाराष्ट्रावर दुहेरी संकट: पुणे, नागपूरसह १२ जिल्ह्यांना अलर्ट, २४ तास धोक्याचे; पाराही वाढणार...
गेल्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून महाराष्ट्राचे तापमान चांगलेच गरम झाले आहे. राज्यातील अनेक भागाने प्रमाणापेक्षा जास्त उन्हाळा सोसला. मात्र आता भारतीय हवामान खात्याने (IMD) ३ मे पासून राज्यातील अनेक भागात तापमानात घट तसेच पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. ३ ते ५ मे दरम्यान उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणच्या काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे शहरात ४ आणि ५ मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाराष्ट्रावर ऊन व पावसाचे दुहेरी संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विदर्भात जोरदार पाऊस
हवामान विभागाने विदर्भातील अनेक गावांत ३ मे रोजी वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यासंदर्भात विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूरसह इतर अनेक जिल्ह्यांत पारा चाळीस अंशाच्या पुढे जाईल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागपूरमध्ये आजचे तापमान ४० अंशाच्या पुढे राहण्याची व अवकाळी पावसाची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अमरावतीतही पारा ४३ अंशाच्या पुढे जाणार असून तेथेही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुण्यातही पावसाची शक्यता
पुण्यात ढगाळ हवामानासह हलक्या श्रेणीतील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शहरातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. या वर्षी पुणे शहराने सामान्यपेक्षा जास्त तापमान अनुभवले. पुण्यात जवळपास १४ दिवस दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले. २०१३ नंतरचे प्रथमच पुणे एवढे उष्ण राहिले. एप्रिलमध्ये शहरात रात्रीचे तापमानही सामान्यपेक्षा जास्त नोंदवले गेले. मे महिन्याची सुरुवातही उष्णतेने झाली. ताज्या अंदाजानुसार शहरात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच ४ मे पासून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतर भागात, विशेषतः विदर्भ आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात, पावसाची शक्यता आहे आणि त्यानुसार आयएमडीने अलर्ट जारी केला आहे.
विदर्भात ऊन-पावसाचा खेळ
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ आणि महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि ४० ते ५० आणि अगदी ६० किमी प्रति तास (ताशी किलोमीटर) वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. वर्धा जिल्ह्यात तापमान ४२ अंश राहिल. तसेच बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यात कमाल तापमान ४२ ते ४२ अंश सेल्सिअर राहणार आहे. या ठिकाणीही अचानक वातावरणात बदल होऊन वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांना ३ मे साठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications