Weather Update : राज्यात ‘या’ भागात वादळी पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यातील अंदाज काय?
यावर्षी मान्सून दाखल होण्यापूर्वीची मे महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर गेल्या 48 तासांतील देशातील हवामानाचा आढावा घेतल्यास अनेक ठिकाणी बदल झाल्याचं दिसून आले आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या शक्ती या चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलल्याने त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेश इथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई क्षेत्रावर पूर्वमोसमी वारे आणि वादळी पावसाचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे.
रायगडला यलो अलर्ट
राज्यात अनेक ठिकाणी आतापर्यंत पावसाचा तडाखा बसला आहे. १८ मेपर्यंत रायगडल जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगांच्या गडगडाटासह वीजा चमकण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर विजा चमकत असल्यास घराबाहेर पडू नका, मोबाईलचा वापर टाळा, इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर रहा असा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच पावसाचा यलो अर्लट जारी करण्यात आला आहे.
२२ मेपर्यंत असणार पाऊस
राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने मे महिन्यातील ऊन्हाचा परिणाम जाणवलेला नाही. भारतीय हवामान खात्याने पुढील किमान तीन ते चार आठवडे राज्यात सरासरीहून अधिक पर्जन्यमान राहील असा अंदाज वर्तवला आहे. मान्सून राज्यात दाखल होईपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असेल असाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान अभ्यासकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात येणारे पुढचे चार दिवस पावसाचा मारा कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्यात मे महिन्यात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. सलग दुसऱ्या दिवशी पाटण तालुक्याला पावसाने झोडपले. तसेच शुक्रवारी सातारा जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे या पावसामुळे ज्वारी, भुईमूग, आंबा पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. तसेच बारामती तालुक्यातील कर्हाटी गावात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे लाखोंच्या पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications