रायगडावरील 'वाघ्या'ची समाधी हटणार का? मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा, मराठा- धनगर समाजाला आवाहन
महाराष्ट्रात सध्या वेगवेगळे वाद चर्चेत आले आहेत. औरंगजेबाची कबर, कामराचं वादग्रस्त वक्तव्य आणि आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन राजकारण पेटलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी ही कबर हटविण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला. त्यानंतर होळकरांचे वंशज या मुद्यावर पुढे आले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर असताना या वादावर मोठं भाष्य केलं.

काय म्हणाले फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पत्रकारांनी त्यांना वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात सर्वांशी चर्चा करावी लागेल. या स्मारकाकरीता होळकरांनी त्यावेळी पैसे दिले आहेत. त्यामुळे थेट पुतळा काढण्याबाबत त्यांच्या समाजात रोष आहे. इतकी वर्षे झाली तो वाघ्याचा पुतळा तिथे आहे. त्यामुळे त्याविषयीचा निर्णय झालेला वाद हा चर्चा करून सोडविण्यात येईल.
वाद करणाऱ्यांचे टोचले कान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरु असणाऱ्या वादाबाबत वाद करणाऱ्यांचे कान टोचले. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असे आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला. या विषयावर वाद करू नये. सर्वांनी बसून मार्ग काढावा. एकीकडे धनगर समाज, दुसरीकडे मराठा समाज, हे दोन्ही समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद घालणं अयोग्य असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले. या प्रकरणात बसून मार्ग काढायला हवा असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
काय आहे नेमकी मागणी?
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, अशी भूमिका गेल्या आठवड्यात संभाजीराजेंनी घेतली होती. त्यांनी याविषयीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. दुसरीकडे संभाजी ब्रिगेड या वादात उडी घेत वाघ्याची समाधी 1 मे पर्यंत हटवण्याची मागणी केली होती. या प्रकारानंतर होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी या वादात आपली भूमिका मांडली. या स्मारकाबाबत आमच्या समाजाच्या भावना आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. ही समाधी हटविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजू ऐकून घेण्याचे मत त्यांनी मांडले होते.












Click it and Unblock the Notifications