महायुतीतील नेत्यांचे वाद केवळ स्वार्थासाठी; अजित पवारांना बाहेर काढण्याचा डाव- वडेट्टीवारांचा दावा
Vijay Wadettiwar : महायुती सरकारमध्ये होणारे वाद आता नेहमीच झाले आहेत. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वाद होत आहेत. मात्र हे वाद राज्यातील जनतेच्या हितासाठी नाही तर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या हितासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तिजोरीत पैसा नसताना 80 निर्णय घेतले जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी करत अजित पवारांना प्लॅनिंग करून महायुतीतून बाजूला सारण्याचे काम केले जात असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
अजित पवारांना शिस्त, म्हणून ते ठरतात अडसर
अजित पवार हे अनेक वेळा अर्थ विभागाचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी काही प्रमाणात का होईना, या विभागात शिस्त पाळण्याचे काम केले आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये ही शिस्त बिघडवण्याचे काम सुरू असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तिजोरीत पैसे नसताना जीआर काढले गेले आहेत. त्यामुळे हे सर्व पाहिल्यानंतर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, हे अजित पवार यांच्या लक्षात झाले असेल. हे महाराष्ट्राला लुटण्याचे काम सुरू आहे. हे पाहिल्यानंतरच अजित पवार यांनी काढता पाय घेतला असावा, असे मला वाटत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

महायुतीला मागासवर्गीयांची चिंता नाही
या सरकारला मागासवर्गीय समाजाची चिंता नाही. सामाजिक न्याय विभागाला पूर्णवेळ सचिव नाही. बहुजन कल्याण सारख्या महत्त्वाच्या खात्याला देखील सचिव नाहीत. कृषी विभागाला सचिव नाहीत. गेल्या चार वर्षापासून मर्जीतील सचिव बसवून या सरकारने तिसरची लूट केली आणि स्वतःचा स्वार्थ साधला. अशा सरकारला महत्त्वपूर्ण खात्यांना पूर्णवेळ सचिव देता येत नाही. तर हे सरकार कोणत्या दिशेने चालवले जात आहे, हे महाराष्ट्र जनता पाहत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
टक्केवारी मोजण्यासाठी हे सरकारचे निर्णय
केवळ टक्केवारी मोजण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. काल 80 विषय मंत्रिमंडळ बैठकीत होते. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राला लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला. जाता जाता जेवढे शक्य आहे तेवढे महाराष्ट्राला लुटण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. अजित पवार यांनी कुठे जावे हा त्यांचा विषय आहे. मात्र, ज्या पद्धतीने त्यांची माणसे निघून जात आहेत. त्यावरूनच ते अस्वस्थ आहेत. त्यातच महायुतीमधील विशेषता भाजप नेत्यांचे भाष्य हे अजित पवार यांना साईड लाईन करण्यासाठीच आहे, असे दिसत आहे. आता महायुतीने कोणाला घेऊन लढायचे हा त्यांचा प्रश्न असल्याचे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications