एका मतासाठी 'त्यांनी' चार कोटी वाटले, वडेट्टीवारांचा आरोप
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्राँस व्होटिंग केलं. या आमदारांचा अहवाल दिल्लीला वरिष्ठांकडे पाठविला असल्याची माहिती आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. गेल्यावेळीही काँग्रेसच्या काही आमदारांनी क्राँस व्होटींग केली होती. मात्र यावेळी हा प्रकार राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मनावर घेतला असल्याचं वडेट्टीवारांनी बोलून दाखवलं.

पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील, असं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पैशाचाही अमाप वापर केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मत दिल्याचा आरोप होतोय. क्राँस व्होटिंग झाल्यामुळेच शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. त्यांना महाविकास आघाडीने पाठींबा दिला होता. दुसरीकडे महायुतीचे पाचही उमेदवार निवडून आले. काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार?
पत्रकारांसमोर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "विधान परिषदेच्या निवडणुकीत काही आमदार आमच्याबरोबर नव्हते. ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही काहींनी गद्दारी केली होती. यावेळी मात्र आम्ही त्या सर्वांवर कारवाई करणार आहोत. गद्दारांना आम्ही शोधून काढलं आहे. कोणी आम्हाला मतं दिली, कोणी दिली नाहीत, कोणी पक्षाशी गद्दारी केली, त्या सर्व आमदारांची यादी आमच्याकडे आहे. या लोकांवर कारवाई व्हावी यासाठी आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या आमदारांबाबतचा अहवाल दिल्लीला पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवला आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील."
नेमकं कुणी केलं क्राँस व्होटिंग?
वडेट्टीवार म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करताना सर्व आमदारांना एक फॉर्म्युला दिला होता. त्यानुसार त्यांनी मतदान करायचं होतं. मात्र काही आमदारांनी पक्षाचा आदेश पाळलेला नाही. आम्ही त्यांची नावे शोधून काढण्यात यशस्वी ठरलो आहोत. या गद्दारांना नक्कीच शिक्षा होईल.
एका घरात राहायचं आणि दुसऱ्या घरातली थाळी उचलायची, असा हा प्रकार होता. तो आता थांबला पाहिजे. यासाठी पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल. पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "या गद्दार आमदारांमध्ये नांदेडमधील काहीजण आहेत. तसेच मुंबईतीलही काही आमदार आहेत. आम्ही त्यांची नावं शोधून काढली आहेत. त्यांची नावं आत्ता उघड करता येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सर्वांना माहिती मिळेल."
एका मतासाठी चार कोटी
सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक पैशाच्या जोरावर जिंकल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला. ते म्हणाले, भाजपाने आणि सत्तेतील खोकेबाज लोकांनी पैशाच्या बळावर काही मतं फोडली. काही मतं राजकीय दबाव टाकून फोडली. आमच्या काही आमदारांनी त्यामुळेच गद्दारी आहे. विधान परिषदेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेतील लोकांनी पैशांचा अमाप वापर केला. एकेका मतासाठी चार-चार कोटी रुपये खर्च केले. राज्याची तिजोरी लुटून या लोकांनी जे पैसे कमावले तेच पैसे निवडणुकीत वापरले, मतांची खरेदी केली आणि त्यांचा उमेदवार निवडून आणला.












Click it and Unblock the Notifications