विधान परिषदेच्या ५ जागांची निवडणूक जाहीर; कुणाला लागणार लाँटरी? कसे राहिल गणीत? वाचा सविस्तर माहिती
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या तीन तर राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. या रिक्त जागांवर आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कसा आहे निवडणूक कार्यक्रम?
विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 27 मार्च रोजी विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. महायुतीमधील भाजपचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आणि शिवसेना शिंदे गटाची एक जागा रिक्त आहे. या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
कोणत्या जागा आहेत रिक्त?
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांचा विधानसभा निवडणुकीतही विजय झाला होता. तसेच शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर हेही विधानपरिषदेचे आमदार विधानसभेवर निवडून गेले होते. या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कुणाला लागणार लाँटरी?
या निवडणुकीमुळे पाच नवीन कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी मिळणार आहे. महायुती झाल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरी टाळावी यासाठी काहींना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन दिले गेले होते. त्यापैकी कित्येक जणांनी आता पुन्हा लाँबिंग सुरु केली आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नेमकी कोणाला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे.
निवडणूक बिनविरोध होणार?
या पाच जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी 57 मतांचा कोटा आवश्यक आहे. विरोधी काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार गट म्हणजेच महाविकास आघाडीच्या मतांची एकत्रित बेरीज केली तरी 57 मते होत नाहीत. त्यामुळे त्यांचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ज्या पक्षाचा जो आमदार विधान परिषदेमधून विधानसभेत गेला ती जागा त्या पक्षाला दिली जाण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications