माझी मुलगी गेलीय, पण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नको, वैष्णवी हगवणेच्या वडिलांची कळकळीची विनंती
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तपास सुरू असतानाच आरोपी पक्षाच्या वकिलांनी केलेल्या वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. बुधवारी पुण्यातील न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली, मात्र याचवेळी हगवणे पक्षाच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत मन हेलावणाऱ्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी हात जोडून, अश्रूंनी डोळे भरून एकच मागणी केली - "माझी मुलगी आता या जगात नाही, कृपया तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका."
हुंडा, धमक्या आणि फॉर्च्युनर प्रकरण
कस्पटे यांनी सांगितले की, "हगवणे कुटुंबाने हुंड्यासाठी वेळोवेळी दबाव टाकला. सुरुवातीला मी एमजी हेक्टर गाडी बुक केली होती, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर फॉर्च्युनर दिली नाही, तर ही गाडी पेटवून टाकू. त्यामुळे मी अखेर फॉर्च्युनर गाडी दिली." त्यानुसार त्यांनी फॉर्च्युनर गाडी हगवणे कुटुंबाला दिली होती.
तसेच, सोनं, चांदीची भांडी आणि इतर महागड्या गोष्टींची मागणीही वेळोवेळी करण्यात आली होती. "माझ्या मुलीच्या दोन लग्नासाठी चर्चा झाली होती, पण दोन्ही वेळा हगवणे कुटुंबाच्या अटींमुळे ती मोडली," असंही त्यांनी सांगितलं.
मारहाण आणि आत्महत्या
वैष्णवीच्या वडिलांनी आरोप केला की, आत्महत्येपूर्वी 5-6 दिवस सतत तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. "चार चापटा मारणं काही गुन्हा नाही, असं सांगणं हास्यास्पद आहे. हे वक्तव्य दु:खद आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं, "तुमच्याही घरी मुली असतील, म्हणून एक बाप म्हणून विनंती करतो - तिच्या मृत्यूनंतर तरी तिच्या चारित्र्यावर प्रश्न उभे करू नका."
निलेश चव्हाणवर गंभीर आरोप
वैष्णवी प्रकरणात निलेश चव्हाण नावाचाही उल्लेख कस्पटे यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, "बाळाला घेण्यासाठी आमचे कुटुंब जेव्हा गेले, तेव्हा बाळ तिथे नव्हते. मग आम्ही निलेश चव्हाणच्या घरी गेलो. तिथे त्याने पिस्तूल दाखवत धमकी दिली. मग बाळ त्याच्याकडे कसं पोहचलं, हा प्रश्न आमच्यासमोर आहे."
जालिंदर सुपेकर यांचा उल्लेख
पत्रकार परिषदेत कस्पटे यांनी सांगितले की, जालिंदर सुपेकर यांच्याशी आमचा थेट संबंध नाही. मात्र, सुपेकर यांचं नाव विवाह पत्रिकेत 'मामा' म्हणून आहे. त्यामुळे हगवणे कुटुंबाशी त्यांचा काहीतरी संबंध असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
हे संपूर्ण प्रकरण केवळ वैयक्तिक दु:खाचे नाही, तर समाजाच्या मानसिकतेवरही प्रश्न उपस्थित करत आहे. एका वडिलांची हतबलता, न्यायाची अपेक्षा आणि मृत मुलीच्या सन्मानासाठी केलेली कळकळीची याचना - हे वास्तव डोळ्यात पाणी आणणारे आहे.












Click it and Unblock the Notifications