उत्तराखंडमध्ये ढगफुटी! केदारनाथ यात्रा थांबली, महाराष्ट्रातील 51 पर्यटकांचे काय झाले? वाचा डिटेल्स
Uttarakhand Cloudburst : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या ढगफुटीमुळे पुन्हा एकदा २०१३ मधील प्रलयाची आठवण झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये कहर झाला आहे. उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, पावसामुळे केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. केदारनाथहून परतताना एसडीआरएफने आतापर्यंत सुमारे १८०० भाविकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.
देहरादूनमध्ये सात जिल्ह्यात शाळा बंद
आज देहरादूनसह ७ जिल्ह्यांमध्ये शाळा बंद आहेत. पर्वतांमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात नदीची पाण्याची पातळी वाढली आहे. बागेश्वर जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे सरयू आणि गोमती नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
उत्तराखंड मध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांची संपर्क करत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.
हे आहेत संपर्क क्रमांक
- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : ०१३५-२७१०३३४ / ८२१
सोलापूरचे चार पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले
उत्तराखंडमध्ये भयानक पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. यामुळे मोठं संकट कोसळलं आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे तर भयानक परिस्थिती आहे. ढगफुटी झाल्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला. या पूरात चारधाम यात्रेसाठी सोलापुरातून गेलेले चार जण अडकले असून ते सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
भारतीय सैन्याकडून युद्ध पातळीवर नागरिकांच्या बचावाचं कार्य सुरु आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रहून उत्तराखंडला गेलेल्या पर्यटकांबद्दल काळजी व्यक्त केली जात आहे. असं असताना आता सोलापूर मधील चार पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून मिळाली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धीरज बागले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी, माधुरी धोटे हे चारजण उत्तराखंडमध्ये अडकले असून त्याचा नातेवाईकांशी संपर्क झाला आहे ते सुखरूप असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ते चौघे ओम साई ट्रॅव्हल्स हरिद्वार मधून प्रवास करत होते त्यांच्या कुटुंबाशी त्यांचा शेवटचा संपर्क पाच ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता झाला आहे.












Click it and Unblock the Notifications