सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : आज कोर्टात काय झालं? उज्वल निकमांनी दिली 'ही' महत्वाची माहिती
Ujjwal Nikam on Sarpanch Santosh Deshmukh murder case : बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ सप्टेंबर रोजी होणार तसेच आरोपीच्या वकिलाने चार्जशीट मधील काढलेल्या त्रुटी फेटाळत या प्रकरणाची चार्ज फ्रेम करण्याची न्यायालयाला विनंती केल्याचे ॲड. उज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आरोपी विष्णू चाटेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने या अर्जावर आपला आदेश राखून ठेवला असून, पुढील तारीख दिली आहे. सरकारी पक्षातर्फे वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्तीसाठी जो अर्ज करण्यात आला आहे, त्यावरही युक्तिवाद झाला. यात बँक खाती गोठवण्याबद्दलचा अर्ज आहे. यावर अद्याप न्यायालयाने कोणताही आदेश दिला नाही आणि हे प्रकरण प्रलंबित आहे. विष्णू चाटेसह इतर आरोपींचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. यावर आज युक्तिवाद झाला असून, न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे.
कराडच्या अर्जावर या तारखेला सुनावणी
यापूर्वी बीड न्यायालयाने वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारी पक्षाचे म्हणणे मागवण्यासाठी आम्ही न्यायालयात अर्ज केला होता आणि त्यावर नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. वाल्मिक कराडच्या उच्च न्यायालयातील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
ॲड. निकम म्हणाले, "अद्याप आरोप निश्चितीची (चार्ज फ्रेम) वेळ आलेली नाही. सर्व आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जांवर निर्णय झाल्यानंतरच या प्रकरणाची आरोप निश्चिती होईल. वेगवेगळे गुन्हे असल्याने दोषारोपपत्रही वेगवेगळी येणे अपेक्षित होते. ही बाब चुकीची आहे, असे आमचे म्हणणे आहे. याबाबत उच्च न्यायालय किंवा स्थानिक न्यायालय जो आदेश देईल, तोपर्यंत यावर चर्चा होईल. सरकारी पक्षाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, तसेच आरोपींचा बचाव करणे हा आमचा अधिकार आहे. प्रत्येक कायदेशीर मार्गाचा अवलंब करूनच हे प्रकरण पुढे जात आहे."
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण काय आहे?
संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील मासाजोग गावाचे सरपंच होते. ९ डिसेंबर २०२४ रोजी काही लोकांनी त्यांचे अपहरण केले. त्यांना निर्घृण मारहाण करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह नांदूर घाट रस्त्याजवळ टाकून दिला. हा खून एका ऊर्जा कंपनीकडून खंडणी वसूल करण्याच्या कटातून झाल्याचा आरोप आहे.
खुनामागचे कारण काय होते?
आरोपींनी बीडमधील एका पवनऊर्जा कंपनीकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सरपंच संतोष देशमुख हे या खंडणीला विरोध करत होते आणि त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मदत केली होती. या वादातून काही दिवसांपूर्वी आरोपींनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. याच रागातून आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यांचा छळ करून त्यांची क्रूरपणे हत्या केली.












Click it and Unblock the Notifications