वक्फ सुधारणा विधेयक ; उद्धव ठाकरे यांची अस्पष्ट भूमिका
Maharashtra Assembly Election 2024 : कट्टर हिंदुत्ववादी संघटना ही शिवसेनेची खरी ओळख. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आक्रमक भाषणाने आपल्या तमाम शिवसैनिकांमध्ये हिंदुत्वाचा विचार रुजवला. त्यामुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणजे कपाळावर टिळा लावलेला आक्रमक हिंदुत्ववादी ही ओळख पक्की झाली होती.
राष्ट्रवादी मुस्लिम नागरिकांना मानाचे स्थान देतानाच बाळासाहेब ठाकरे देशविरोधी शक्तींचा कठोर शब्दात निषेध करीत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल बाळासाहेबांच्या मनात नितांत आजाराची भावना होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांची मनस्थिती द्विधा झालेली आहे. हिंदू मते दुरावण्याची भीती आणि मुस्लिम मते इतरत्र जाण्याची भीती, अशा कात्रीत उद्धव ठाकरे सापडले आहेत. आणि म्हणूनच नक्की काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडल्याचे दिसते. विविध घटनात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संघटनेच्या नेत्यांनी घेतलेली भूमिका खूपच अस्पष्ट आहे. त्याचाच फटका उद्धव ठाकरे गटाला बसताना दिसत आहेत.

उद्धव ठाकरे यांचे अजब प्रश्न
काँग्रेसचे नेते सावरकरांचा सातत्याने अपमान करीत असतात. तर शिवसेनेची अधिकृत भूमिका ही सावरकर प्रेमी अशी आहे. काँग्रेसच्या मुखपत्रात सावरकरांचा अत्यंत हीन शब्दात उल्लेख करण्यात आलेला असला तरी उद्धव ठाकरे यांनी किंवा त्यांच्या कोणत्याही नेत्याने त्या कृतीचा एका शब्दानेही निषेध केला नाही. उलट महाराष्ट्रात येऊन सावरकरांबद्दल अनुदान काढणाऱ्या राहुल गांधी यांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे स्वतः नांदेड पर्यंत गेले होते. गाय ही हिंदू धर्मीयांची श्रद्धेय आहे. हिंदू धर्मात गाईला गोमाता असे म्हटले जाते. महाराष्ट्र सरकारने देशी गाईला राज्य मातेचा दर्जा दिला आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांना धड भूमिका घेता आलेली नाही. "मराठी अभिजात भाषा झाली तर मग महाराष्ट्राची भाषा कोणती?" असा अजब सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच "गाय ही राज्यमाता असेल तर तिचे हंबरणे ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे का?" असे विचित्र तरकट देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
मुस्लिमांच्या संदर्भात भूमिका घेताना अडचण
विशेषतः मुस्लिमांच्या संदर्भात नेमकी कोणती भूमिका घ्यावी, हे उद्धव ठाकरे यांना नीट उमगलेले नाही. त्यामुळेच एखादी भूमिका घेताना ते चाचपडताना दिसतात. आम्हीही हिंदुत्ववादी आहोत परंतु आमचे हिंदुत्व तुमच्या शेंडी जाण्याचे हिंदुत्व नाही, असे म्हणणारे उद्धव ठाकरे त्याची साक्ष देतात. "राम मंदिराचे आम्ही स्वागत करतो परंतु तुमच्या मित्रांसाठी तिथल्या जमिनी घेतल्या जात असतील तर काय उपयोग" अशी संधीग्ध भूमिका उद्धव ठाकरे घेतात.
मतपेटीची मजबुरी
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या रॅलीत मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सहभागी झाला होता. यावरून काहूर उठले परंतु त्या विषयावर उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. " आमच्या रॅलीत कोण सहभागी होते ते आमच्या नियंत्रणात नाही", असे सांगून उद्धव ठाकरे गटाने वेळ मारून नेली. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने भाजपच्या विरोधात एक गठ्ठा मतदान केले. आजपर्यंत कधीही न मिळालेली मते उद्धव ठाकरे यांचा उमेदवारांना मिळाली. मुस्लीम बहुल मतदार संघात उद्धव ठाकरे यांचे उमेदवार 80 - 80 हजारांची आघाडी घेते झाले. त्यामुळे मुस्लिम मते ही उद्धव ठाकरे यांची मजबुरी बनली आहे. पण त्याच वेळी पारंपरिक हिंदुत्ववादी मतदार दुरावण्याची भीती सुद्धा उद्धव ठाकरे यांना वाटते आहे.
वक्फ सुधारणा चर्चेला गैरहजेरी
सध्या देशभरात वक्फ सुधारणा विधेयकाचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. भारतीय जनता पक्षाने हे विधेयक संसदेत सादर केले. वक्फ बोर्डाच्या अनिर्बंध अधिकारांना आळा घालण्यासाठी हे विधेयक आणले जात असल्याचे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाला स्पष्ट विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत हे विधेयक संमत होऊ देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली तर मुस्लिमांच्या संदर्भात कायदे आणताना मुस्लिम समाज घटक यातील प्रत्येकाची चर्चा केली पाहिजे, असे राष्ट्रवादीने स्पष्ट केले. पण संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार उपस्थित नव्हते. त्यामुळेच मुस्लिम समाजात नाराजीची भावना निर्माण झाली. काही मुस्लिमांनी थेट उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर मोर्चा काढून उद्धव यांच्या खासदारांच्या कृतीचा जाग विचारण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे कधीही मुस्लिमांची बाजू घेऊ शकत नाहीत,असा थेट हल्लाबोल एम आय एम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही केला. सभागृहाप्रमाणेच सभागृह गृहाच्या बाहेर देखील उद्धव ठाकरे यांना वक्फ सुधारणा विधेयकाच्या संदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका घेता आलेली नाही. किंबहुना अशी कोणतीही भूमिका घेण्यास उद्धव ठाकरे टाळाटाळ करीत असल्याचे स्पष्ट दिसते आहे.
वाटेकरी झाले गोळा
भायखळा हा मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात मिळालेल्या आघाडीच्या जोरावर दक्षिण मुंबईतून उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार म्हणून निवडून आले. ही आघाडी आपल्या गटामुळेच मिळाली असा दावा करीत उद्धव ठाकरे यांनी भायखळ्याची जागा पदरात पाडून घेतली आणि तिथे उमेदवार देखील दिला. परंतु याच मतदारसंघात आता एमआयएमने ही उमेदवार दिला आहे.भायखळा येथील झुला मैदानात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची सभा झाली. त्यांनीही त्या सभेत सुधारणा विधेयकाच्या संदर्भात ठाम भूमिका घेतली नाही. आदित्य यांच्या सभेनंतर काही दिवसातच असदुद्दीन ओवेसी यांची सभा त्याच मैदानावर घेण्यात आली आणि त्याला आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या दुप्पट गर्दी गोळा झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पोटात गोळा निर्माण झाला नसेल तरच नवल.
तारेवरची कसरत
नागरिकत्व सुधारणा कायदा, एन आर सी कायदा, वक्फ सुधारणा कायदा असे एका मागोमाग एक मुद्दे भविष्यात चर्चेला येणार आहेत. हे सगळे कायदे आपल्या विरोधात आहेत असा मुस्लिमांचा समज झालेला आहे. आणि वेळोवेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला या सगळ्या कायद्यांच्या संदर्भात ठोस आणि ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. ती घेतली तर हिंदू किंवा मुस्लिम यापैकी एक मतपेटी कायमची नाराज होण्याची शक्यता आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे दोरीवरची कसरत करीत असल्याचे दिसते आहे.












Click it and Unblock the Notifications