शेतकरी संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट पाहता का?, सरकार कुचकामी; उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा
Uddhav Thackeray on farmer crisis target to Narendra modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
नुकत्याच झालेल्या भीषण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, हे संकट अत्यंत भयानक व विदारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर, "शेतकरी संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट पाहता का?" असा खडा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. त्यांनी सध्याचे सरकार 'कुचकामी' असल्याचे म्हणत प्रशासकीय अनास्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती
उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना तेथील परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. ते म्हणाले की, आजपर्यंत अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, पण यंदाची आपत्ती भीषण आणि अभूतपूर्व आहे. 'जणूकाही आभाळ फाटले' अशा प्रकारची ही स्थिती असून, शेतकऱ्यांचे सर्वस्व पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. पिकांचे नुकसान झालेच, पण घरे, दारे, तसेच मुलांचे शालेय साहित्यसुद्धा वाहून गेले आहे, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे.
कर्जमाफीची योग्य वेळ
या संकटात शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे आणखी वाढले आहे. शेतीत कमरेपर्यंत चिखल-पाणी असतानाही शेतकरी अक्षरशः धायमोकलून रडत होते. शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या कर्जमाफीचा संदर्भ देत, "तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली, तशी या सरकारला करायला लावा," अशी हात जोडून विनंती केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या कर्जाच्या डोंगरातून आणि संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी देण्याची हीच सर्वात योग्य वेळ असल्याचे ते म्हणाले.
तुटपुंजी मदत आणि जमिनीचे झालेले अपरिमित नुकसान
राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याची टीका त्यांनी केली. केवळ ७-८ हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देऊन काहीच साध्य होणार नाही. कारण यावेळी केवळ पीक गेले नाही, तर नद्यांचे पाणी शेतात घुसून जमीनच खरडून गेली आहे. ही जमीन पुन्हा कसण्यायोग्य बनवण्यासाठी शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार किमान ३ ते ५ वर्षे लागतील आणि त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येईल.
या विदारक परिस्थितीत शेतकरी डोक्यावरील कर्ज कसे फेडणार, मुलांना पुन्हा शाळेत कसे पाठवणार आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार, हे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. ठाकरे यांनी एका ३१ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येची हृदयद्रावक घटना सांगितली. फक्त १५ दिवसांचे बाळ मागे सोडून गेलेल्या या तरुणावर २ लाखांचे कर्ज होते. अशा घटना टाळण्यासाठी तत्काळ कर्जमाफी गरजेची असल्याचे त्यांनी जोर देऊन सांगितले.
प्रलंबित मदत आणि केंद्राकडील अनास्था
ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या मदतीतील प्रशासकीय दिरंगाईवरही बोट ठेवले. मागील काही वर्षांपूर्वी जाहीर केलेली १४ हजार कोटींची मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, तसेच २०१७ च्या कर्जमाफीची प्रतीक्षा कायम आहे. याउलट, त्यांच्या सरकारने कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती दिली, असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. सरकारने पंजाब आणि हिमाचल प्रदेशाला मदत केली, पण महाराष्ट्राकडे 'ढुंकूनही पाहिले नाही'. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांना 'प्रस्ताव पाठवण्याची' सूचना करण्यात आली. यावर संतप्त होत उद्धव ठाकरे यांनी विचारले, "कसला प्रस्ताव? तुमच्या डोळ्यापुढे सर्वकाही दिसत आहे." महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान येत नाहीत का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात मदत जमा करण्याच्या कृतीचा संदर्भ देत, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना केंद्राने प्रस्तावाची वाट पाहणे हे कुचकामी सरकारचे लक्षण आहे, असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी काय केली मागणी?
१. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करावे.
२. पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तत्काळ जाहीर करून कालबद्धपणे वाटप करावे.
३. बँकांनी पाठवलेल्या नोटीसा थांबवून कर्जाची थकहमी घ्यावी.












Click it and Unblock the Notifications