'भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू!'; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; अमित शहांची लाज काढली!
Uddhav Thackeray Hits Back at Fadnavis & Amit Shah : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात गेल्यानतंर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. विदर्भाला अधिवेशनातून काय मिळाले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधारी पक्षावर हिंदुत्व, भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जोरदार हल्ला चढवला.

फडणवीसांना कवितेतून प्रत्त्युत्तर
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना 'कोण होतास तू, काय झालास तू' असा शेरा मारला होता आणि अमित शाह यांच्या संसदेतील भाषणाचा व्हिडिओही शेअर केला होता. या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्याच शैलीत पलटवार केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की -"मला मुख्यमंत्र्यांची दया येते की, 'कोण होतास तू, काय झालास तू... एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू काय झालास तू... भ्रष्टाचाऱ्याला पांघरुनात घेतलंस तू.' महाराष्ट्राची ही संस्कृती नाही." अशा शब्दांत त्यांनी भाजपमध्ये सामील झालेल्या अनेक नेत्यांना लक्ष्य केले आणि फडणवीसांनी सत्ता टिकवण्यासाठी 'भ्रष्टाचारी' लोकांना सोबत घेतल्याचा आरोप केला.
अमित शहांवर हिंदुत्वावरून थेट निशाणा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर अल्पसंख्यांकांच्या व्होटबँकेसाठी हिंदुत्व सोडल्याची टीका केली होती. यावर संताप व्यक्त करत ठाकरेंनी अमित शहांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी थेट भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.
किरण रिजीजू आणि गोमांस मुद्दा
"अमित शाह खूप हिंदुत्ववादी आहेत, त्यांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. वंदे मातरमची तुम्ही चर्चा करताय, पण अमित शाह, तुमच्या मंत्रिमंडळात किरण रिजीजू हे मंत्री आहेत, ते म्हणतात मी गोमांस खातो. ९ डिसेंबरचा हा फोटो आहे, त्यांच्यासोबत ते जेवण करत आहेत. तुम्ही हिंदुत्ववादी म्हणताय, मग गोमांस खाणाऱ्या मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेणार का?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, "माझ्यावर बोलण्याआधी तुम्ही तुमच्या बुडाखालचं हिंदुत्व बघावं" असा कठोर टोलाही लगावला.
जय शाह आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट
याशिवाय, अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्यावरही त्यांनी टीका केली. "जय शाह पाकिस्तानसोबत भारताला खेळायला लावतो. आता तुम्ही सांगा? जय शाह हिंदुत्ववादी नाही म्हणून तो पाकिस्तानसोबत खेळायला लावतो का?" असा उपरोधिक सवाल करत त्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली.
शेतकऱ्यांना मदतीचा प्रस्ताव अन् पीक विमा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही ठाकरेंनी सरकारला घेरले. केंद्रीय कृषी मंत्री म्हणतात राज्याकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही, आणि नंतर घाईघाईने मदतीचा प्रस्ताव पाठवला गेला. या प्रस्तावात नेमकी किती मदतीची मागणी केली आहे, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. पीक विम्याची मदत झाली नाही, तर शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या कंपन्यांवर सरकार काही कारवाई करणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विरोधी पक्षनेता पदाचा मुद्दा
विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनात शिवसेनेने (उबाठा) विरोधी पक्षनेता पदावर दावा सांगितला असून, भास्कर जाधव यांचे नावही दिले आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय झालेला नाही. यावरून ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले. "विरोधी पक्षनेतेपदाला तुम्ही घाबरताय का? उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाही. त्यामुळे, मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षनेते पद का दिलं जात नाही, हे स्पष्ट करावे."
'लाडक्या बहिणींना' दिलेले आश्वासन
राज्यातील नगरपालिका निवडणुकीत झालेली दंडेलशाही आणि पैशाचा अमाप वापर यावर टीका करताना, त्यांनी 'बेबंदशाही' सुरू असल्याची टीका केली. निवडणुकीपूर्वी भाजपने लाडक्या बहिणीला दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. "लाडक्या बहिणीला २१०० रुपये कधी देणार? हा मुद्दा उपस्थित करत राहणार," असे ठाकरे म्हणाले. "जर त्यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले नाहीत, तर त्यांना घरी बसावे लागेल," असा इशाराही त्यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications