...तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?" उद्धव ठाकरेंचा सवाल
मुंबई : बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ मविआने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. महाराष्ट्र बंद विरोधात याचिका दाखल झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा व्यक्तीने पुढील आदेश देईपर्यंत 24 ऑगस्ट रोजी किंवा त्यानंतरच्या कोणत्याही तारखेला बंदची हाक देऊ नये, असा आदेश हायकोर्टाने दिल्याने मविआला बंद मागे घ्यावा लागला, मात्र मविआकडून पुणे मुंबईसह राज्यभरात निषेध आंदोलन सुरु आहेत.
मुंबईतील शिवसेना भवनसमोर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. "भारत बंद झाला तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
सरकारने खणखणीत बाजू घ्यायला हवी होती-उद्धव ठाकरे
अजूनही महाराष्ट्रात जिवंत मनं आहेत. ते तुम्ही दाखवून दिलं. जे उद्दाम सरकार घटनाबाह्य सरकार राज्य करत आहे. त्या सरकारची किव येते. नराधमांवर पांघरून घालण्याचं त्यांना पाठिशी घालण्याचं काम सुरू आहे. सरकारने खणखणीत बाजू घ्यायला पाहिजे होती. पण जेव्हा दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नसतो.

आपण महाराष्ट्र बंद पुकारला होता. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला असता. याची जाणीव सरकारला झाली. एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही. हे निर्ढावलेलं सरकार आहे. बंद शंभर टक्के यशस्वी होणार याचा अंदाज आला तेव्हा त्यांचे चेलेचपाटे कोर्टात पाठवले अन् कोर्टाकडून बंदला अडथळा केला, अशी उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली
तेव्हा याचिकाकर्ते कुठे होते?
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी काल कोर्टाला धन्यवाद दिले. आपली केस सर्वोच्च न्यायालयात अडीच वर्ष सुरू आहे. न्याय मिळेल याचा विश्वास आहे. पण कोर्ट त्वरेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं याचं अभिनंदन करतो. कोर्टाने ठरवलं तर निर्णय घेऊ शकतं. महिलांना मुली बाळींना सुरक्षा पाहिजे म्हणून बंद पुकारला होता पण, त्यात अडथळा आणला. मागील आठवड्यात भारत बंद झाला. इतर राज्यात रेल्वेही बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिका कर्ते कुठे होते, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.












Click it and Unblock the Notifications