जरांगे पाटील, हाके यांच्या जीवाशी हे सरकार का खेळत आहे- उध्दव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर : आरक्षण आमच्या हक्काचे आहे, ते द्यायचे सोडून हे सरकार जाती-जातीत भांडणे लावत आहे. मराठा, ओबीसी, धनगर बांधवांसह सर्वांनी एकत्र यावे आणि यांचे मनसुबे उधळून लावावे. किती दिवस यांच्या पोळ्या भाजायच्या. मी आज तुम्हाला पाठींबा देतो, असं उध्दव ठाकरे म्हणाले.

आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके यांच्या जीवाशी हे सरकार का खेळत आहे. तोडगा काढण्याऐवजी तारखा देत आहेत, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात आज (ता. 7) ते बोलत होते. यावेळी भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदेंसह काही पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
गद्दारांनी माझा पक्ष चोरुन शिवसेना नावावर निवडणूक जिंकली. माझ्या पक्षाची निशाणी धनुष्यबाण चोरला. मी काढलेला माझ्या वडीलांचा फोटो लावून त्यांनी मते मागून विजय मिळवला. या गद्दारांना त्यांना लाज वाटायला हवी. असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला.
ठाकरे म्हणाले, आपल्यासोबत जे केले तेच त्यांनी शरद पवारांसोबत केले. शिवसेनाप्रमुखांचे नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले आपल्याला वाटले की पवित्र भावनेने टाकले पण त्यांच्या मनात तेव्हापासूनच कपट कारस्थान सुरु झाले होते.राष्ट्रपुरुषांचा फोटो कुणालाही वापरता येतो, म्हणूनच शिवसेनाप्रमुखांच्या फोटोचा वापर पंतप्रधान मोदींनी केला. मशाल ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मिळाली. त्यानंतर मशालीचा प्रचार सुरु केला. या गद्दारांनी जो विजय मिळवला तो त्यांनी चोरुन मिळवला. त्यांना लाज वाटायला हवी. माझ्या पक्षाची निशाणी धनुष्यबाण चोरला. मी काढलेला माझ्या वडीलांचा फोटो लावून त्यांनी मते मागून विजय मिळवला.अरे चोरट्यांनो, भामट्यांनो हा तुमचा विजय नाही.
बाळासाहेबांचा फोटो लावून विजय मिळवला
ठाकरे म्हणाले,ग्रामीण भागात आणि शहरात हिंदुहृदयसम्राटांचा फोटो लावायचा, खाली धनुष्यबाण लावायचा आणि त्याखाली मत द्या, विजयी करा असे म्हणायचे. म्हणजेच बाळासाहेबांचा फोटो लावून मते मागत निवडून हे आले. लोकांना फसवून यांनी विजय मिळवला. मी बाळासाहेबांचे संस्कार घेत चोरलेला धनुष्यबाण नसतानाही विजय मिळवून दाखवला. हिंदी भाषिकही मला मते देणार होते त्यांनी धनुष्यबाणाला मतदान केले. त्यांना नंतर उमगले की, ठाकरेंची निशाणी मशाल आहे पण आता सर्वांचा सम्रंभ दूर झाला.
अजूनही विमानतळाचे नाव औरंगाबादच
ठाकरे म्हणाले, आम्ही संभाजीनगरचा विकास केला पण तरीही पराभव स्वीकारावा लागला. आपण कुठे कमी पडलो यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन काय चूक झाली ते विचारा. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर मी मुख्यमंत्री असताना केले. पण आज हे सरकार असूनही विमानतळावर औरंगाबाद हेच नाव आहे. मी शहराचे नामकरण केले. आजही मतदारसंघाचे नाव औरंगाबाद आहे मग या सरकारने दोन वर्ष काय केले.
आता ते जनतेची घरे फोडायला निघाले
ठाकरे म्हणाले, महिलांसाठी योजना आणली ठीक आहे योग्य आहे पण युवकांसाठी काय योजना आहे ते बेरोजगार आहेत. उद्योग गुजरातला गेले या सरकारने काय केले. मोदी गॅरंटी कसली गॅरंटी कालच एका गद्दाराला त्यांनी क्लिन चिट दिली. बहिणीला तुम्ही योजना देतात पण त्याच घरातील भावाचे काय आमचे घर फोडले, शिवसेना फोडली. आता जनतेची घर फोडायला हे सरकार निघाले.पिळून काढायचे, हक्काचे द्यायचे नाही असे हे सरकार आहे. पण महाराष्ट्र स्वाभीमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराज स्वाभीमानी होते.
तुमच्या पेटलेल्या घरावर ते पोळी भाजत आहेत
आपण गद्दारांच्या नादी लागून लाचारी पत्कारणार असू तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आरक्षणावर आज मी जाहीर बोलणार आहे. हा महाराष्ट्र माझा आहे. माझ्या डोळ्यादेखत महाराष्ट्रात जाती-पातीत भांडणं भाजप लावत आहे. मी सर्व जातीपातीच्या लोकांना हात जोडून सांगतो की, कृपा करा यांच्या नादी लागू नका.
महाराष्ट्रात ते आग लावण्याचे काम करीत आहेत. तुमच्या पेटलेल्या घरावर ते पोळी भाजत आहेत. त्यांची राजकारणातली घरं आधी जाळा (त्यांची घरे नाही) अर्थात त्यांना निवडणुकीत पाडा. जर लढायचेच असेल तर सर्वांनी एकत्र या. मराठा, ओबीसी, धनगर बांधवांसह सर्वांनी एकत्र यावे आणि यांचे मनसुबे उधळून लावा. मी आज तुम्हाला पाठींबा देतो. जरांगे पाटील, हाके यांच्या जीवाशी हे सरकार का खेळत आहे. तोडगा काढण्याऐवजी तारखा देत आहेत.












Click it and Unblock the Notifications