आझाद मैदानात आपले बांधव, कसलीही कमी पडू देऊ नका; उद्धव ठाकरेंचे मोठे आदेश
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट फोनवरून पाठिंबा दिला. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनोज जरांगे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर संवाद घडवून आणला. दीड ते दोन मिनिटे चाललेल्या या चर्चेत नेमकं काय बोलणं झालं, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

नेमकं काय घडलं?
अंबादास दानवे यांनी आज पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी मराठा आरक्षणासह मुंबईत आलेल्या आंदोलकांच्या सोयी-सुविधांबाबत चर्चा सुरू होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचा फोन आला. दानवे यांनी तातडीने जरांगे पाटील आणि ठाकरे यांच्यात फोनवर संवाद घडवून आणला. या भेटीनंतर बोलताना दानवे म्हणाले, "दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मला माहीत नाही, ते मनोज जरांगेच सांगू शकतील."
या फोन कॉलमध्ये मराठा समाजाच्या मागण्या आणि मुंबईत आलेल्या आंदोलकांच्या व्यवस्थापनावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या सूचना
उद्धव ठाकरे यांनी केवळ फोनवर बोलूनच थांबले नाहीत, तर त्यांनी मुंबईतील आपल्या सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. सरकार आंदोलकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात कमी पडले असल्याचा आरोप करत, ठाकरेंनी शिवसैनिकांना आंदोलकांसाठी पाणी, अन्न आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आरक्षणासाठी संघर्ष करत मुंबईत एकवटले आहेत. अशा वेळी शिवसैनिकांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे.
सरकारमध्ये तीन गट असल्याचा संजय राऊतांचा आरोप
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करताना, 'सरकारमध्ये तीन गट आहेत आणि शिंदे गट आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहे, कारण त्यांचा उद्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा आहे,' असा गंभीर आरोप केला आहे.
जरांगेंकडून शिंदेंचे कौतुक
या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनीच एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले होते. "एकनाथ शिंदे साहेब हा माणूस खरा आहे, साथ देतो, जनतेची वेदना समजून घेतो," असे जरांगे पाटील म्हणाले होते. त्यामुळे, आता राज ठाकरे यांनी शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर सरकार आणि आंदोलक यांच्यातील संबंधांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications