अरे भाई कहेना क्या चाहते हो... अशी भाजपची अवस्था; वक्फ विधेयकावरुन ठाकरेंनी धो-धो धूतले
बहुचर्चित वफ्क सुधारित विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. या बिलानंतर राजकीय क्षेत्रातून यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बिलावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला. या बिलाला विरोध नाही, पण भाजपाच्या ढोंगीपणाला आमचा विरोध आहे असं म्हणत ठाकरे यांनी भाजवर जोरदार निशाणा साधला. याबाबत त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदही घेतली. अरे भाई कहेना क्या चाहते हो... या चित्रपटातील डायलाॅगप्रमाणे भाजपची अवस्था झालीय, अशी टिकाही ठाकरेंनी केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, या बिलामुळे भाजपाचे खरे रूप देशाला कळलंय. हिंदुत्वाबाबत भाजपाची धरसोड वृत्ती हिंदूंनाही कळलीय. हे बिल मुस्लिमांच्या बाजूने आहे की विरोधात हे भाजपाने सांगावे. भाजपाचे नेते मुस्लिमांचे गुणगान गात होते. हिंदुत्व कुणी सोडलंय? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. जिनांनाही लाजवेल अशी भाषणे काल भाजपा नेत्यांनी केली. भाजपाचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. मुस्लिमांच्या हिताचे बिल आणले म्हणताय, मग गरीब हिंदूंसाठी भाजप काय करणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
वक्फ जमिनीवर भाजपचा डोळा
ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यात आधीच देवस्थानच्या जमिनी हडपल्या गेल्यात. जर कुठल्या धर्माच्या धार्मिक जमिनीमध्ये गैर धर्माची व्यक्ती आणून बसवलं तर त्या धर्मातील लोकांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. वक्फ बोर्डाने कधीही संसदेच्या जमिनीवर दावा केलेला नाही. काल किरण रिजीजू यांनी भाषणात सांगितलं की, वक्फने संसदेच्या जमिनीवर दवा केला होता. परंतु यावेळी उद्धव ठाकरेंनी याबाबत एक बातमी वाचून दाखवली. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी आपल्या मित्राच्या घशात घालण्याचा डाव आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.
शिंदे गटावरही साधला निशाणा
ठाकरे म्हणाले की, आम्ही हिंदुत्व सोडलं, अशी टिका आमच्यावर करण्यात आली. हे बिल मुस्लिम हिताचे आहे, असं सांगून काल भाजपावाले मुस्लिमांचे लांगूलचालन करताना दिसले. तेव्हा गद्दारांनी शेपूट का घातली. ते यावर बोलले नाही, अशी टीका ठाकरेंनी शिंदे गटावर केलीय. तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगू नका, तेव्हा तुम्ही बच्चे होता, असा टोला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. बाळासाहेबांनी देशातील मुसलमानांना देशद्रोही कधीही म्हटले नाही. आजही देशात कडवट देशप्रेमी मुस्लिम राहतात. माझ्या पक्षातही अनेक देशप्रेमी मुस्लिम असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.
झेंड्यावरील हिरवा रंग काढवा
या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपाने जुमलेबाजी बंद करावी. भाजपाने गोरगरिबांमधील मारामाऱ्या लावणे बंद करावे. वक्फ बिलाचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. आम्ही एनडीएत असलो तरी यावर भूमिका घेतली असती. भाजपाचा हिंदुत्वाचा ढोंगीपण समोर आला आहे. माझे भाजपाला आव्हान आहे की, भाजपाने झेंड्यावरील हिरवा रंग काढून दाखवावा. 370 कलम हटवले, तेव्हा आम्ही समर्थन दिलं होतं. वक्फ बिलात काही सूचना होत्या. यात पारदर्शकता हवी होती. त्या केंद्राने ऐकून घेतल्या पाहिजे होत्या. पण तसे कोणाचेही ऐकून घेतले नाही. तसेच किती काश्मिरी पंडितांना जमिनी मिळाल्या, याचे उत्तर भाजपाने द्यावे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला.












Click it and Unblock the Notifications