'राजा उदार अन् हाती टरबूज दिलं', पॅकेज नव्हे ही मोठी थाप'; कर्जमुक्तीसाठी ठाकरेंचा फडणवीसांवर आसूड
uddhav thackeray hambarda morcha : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आज रस्त्यावर उतरली. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी छत्रपती संभाजीनगर येथे काढलेल्या 'हंबरडा मोर्चात' सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर, अत्यंत कठोर शब्दांत हल्लाबोल केला. सरकारने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे 'इतिहासातील सर्वात मोठी थाप' असल्याचा आसूड त्यांनी ओढला.
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्याची आठवण करून दिली आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत सरकारला सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. सरकारने जाहीर केलेले मदत पॅकेज शेतकऱ्यांना अमान्य असून, ते स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.

फडणवीसांवर निशाणा साधताना ठाकरे काय काय म्हणाले?
"पॅकेज पाहिल्यावर सगळ्यांना असं वाटलं की इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज आहे. पण नाही, ही इतिहासातली सर्वात मोठी थाप आहे. आजपर्यंत इतकी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारलेली नाही. इतकी मोठी थाप देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मारलेली आहे."
५० खोक्यांवरून टीका
"५० हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागत आहोत? तर ५० खोके ज्यांनी घेतले आहेत, त्यांच्याकडे मागत आहोत," अशी बोचरी टीका त्यांनी केली.
पंतप्रधानांवर प्रश्न
पंतप्रधान मुंबईत येऊन गेले, पण त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांबद्दल कोणताही उल्लेख नव्हता. "ज्या पंतप्रधानांना आपण जिथे चाललो आहोत तिथली परिस्थिती माहित नाही, तर आपण त्यांच्याकडे काय न्याय मागत आहोत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकार खुर्चीत बसून अंडी उबवणार का?
उद्धव ठाकरे म्हणाले, पीकविम्यासाठी 5 हजार कोटींची घोषणा केली. पण सरकारवर कुणाचाही विश्वास उरला नाही. मी मुख्यमंत्री असताना या सर्वांचा अभ्यास केला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकार एकेक वाटा देते. उर्वरित एक हिस्सा हा शेतकरी देत असतो. मध्यंतरी यांनी 1 रुपयात विमा हे टुमणे काढले. ही योजनाही बंद झाली.
सरकारने आता पिकविम्यात शेतकरी मेला तरी त्याला पैसे मिळणार नाहीत असे निकष टाकलेत. त्यानंतरही तुम्ही नाक वर करून सांगता शेतकऱ्यांना आम्ही 5 हजार कोटींचा विमा देऊ. कुठून देणार? कसा देणार?
एक कोंबडी मेली तर तिला 100 रुपयांची नुकसान भरपाई दिली जात आहे. पण आता बाजारात चिकनचा काय भाव आहे? शेतकऱ्यांना एका कोंबडीचे 100 रुपये देता, मग तिची अंडी कोण उबवणार? सरकार का?
मेहनत शेतकरी करणार आणि हे सत्तेच्या खुर्चीत बसून अंडी उबवणार. एका गायीसाठी 37 हजार रुपये मिळत आहेत. पण एवढ्या पैशांत दुभती गाय मिळते का? किमान 1 लाख रुपये लागतात. आम्ही हेक्टरी 50 हजार रुपये मागतो. पण इकडे एका गायीलाच 1 लाख रुपये लागत आहेत असे हे चित्र आहे.
'राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं'
देवेंद्र फडणवीस यांनी मदत पॅकेज देताना 'राजा उदार झाला' असे विधान केले होते, त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी सरकारची खिल्ली उडवली. "कैलास, तुम्ही जे म्हणालात राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. पण आता एका शेतकऱ्याने सांगितले की, साहेब, हातात टरबूज दिलं." हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा चालली आहे, असे ठाकरे म्हणाले.
फडणवीसांना आव्हान: मुख्यमंत्री यांनी 'खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार आहोत,' असे म्हटले होते. यावर ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले की, "तुमची नियत असेल, तर दिवाळीपूर्वी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करा."
पुनर्गठन नको, 'कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे'
शेतकऱ्यांनी न्याय हक्क मागितला तर त्याचे राजकारण होत आहे, अशी टीका करणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरे कडाडले. "कर्जाचे पुनर्गठन करणार असे सांगितले. आम्हाला हे पुनर्गठन नको आहे. आजचं मरण उद्यावर नको. आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आहे."
स्वतःच्या कामाची आठवण: "मला अधिकार आहे, कारण मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्त करून दाखवलं होतं," असे सांगून त्यांनी आपल्या कार्यकाळातील कर्जमाफीची आठवण करून दिली.
राज्य सरकारला इशारा
"आम्ही सरकारला इशारा देत आहोत, जर तुम्ही कर्जमुक्त केली नाही, तर आम्ही फक्त मराठवाडा नाही, तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरवून तुमचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही."
उद्धव ठाकरे यांनी या मोर्चातून राज्य सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणताही समझोता केला जाणार नाही आणि संपूर्ण कर्जमुक्ती मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील, असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications