राहुल गांधींनी भाजपचा बुरखा फाडला, ही बोगस जनता पार्टी आहे: उद्धव ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. "ही बोगस जनता पार्टी आहे, जर प्रामाणिकपणे निवडणूक झाली तर ते महाराष्ट्रात जिंकू शकत नाहीत," असा घणाघात त्यांनी केला. नुकत्याच झालेल्या राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधींनी भाजपचा खरा चेहरा उघड केला असल्याचा दावाही त्यांनी केला.

पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार का?
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "कबुतर, कुत्रे आणि हत्तींसाठी लोक रस्त्यावर येतात, ही चांगली गोष्ट आहे. पण पहलगामच्या घटनेवेळी माणुसकी कुठे जाते?" असे विचारले. ते पुढे म्हणाले, "ते 'गरम सिंदूर' वाहत असल्याचे सांगतात, पण दुसरीकडे देशाचा संघ पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार आहे. जय शाह तुमचा कोण लागतो? आता क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का?"
सोनिया कुरेशी या सैन्य अधिकाऱ्याला 'दहशतवाद्यांची बहीण' म्हणणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरही त्यांनी टीका केली. "जगभरात आपलं शिष्टमंडळ गेलं, पण एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
घुसखोरी आणि भ्रष्टाचारावरून भाजपवर टीका
"बांगलादेशच्या शेख हसीनाला आम्ही आसरा दिलेला नाही," असे सांगत उद्धव ठाकरे यांनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, "तुम्ही (भाजप) भ्रष्टाचाऱ्यांना आसरा देता आहात. या सर्वांची कीव येते पण नेमकी कोणाची कीव येते, हे कळत नाही."
याव्यतिरिक्त, त्यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरूनही भाजपला टोला लगावला. "रशियाने अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केल्यावर ऑलिंपिकवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तुम्ही देश म्हणून ठाम आहात हे दाखवून द्या," असे सांगत, "पाकिस्तानसोबत चीनही होता. पाकिस्तान चीनचा निषेध करत होता का? हे न शिकल्याचा परिणाम आहे. यांना चांगला शिक्षक मिळाला असता तर?" असे म्हणत त्यांनी भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.












Click it and Unblock the Notifications