मीच तुझा भाऊ म्हणणारे हे सगळे फुकटं खाऊ, विधानसभेत गद्दारांची खैर नाही - उद्धव ठाकरे कडाडले
Uddhav Thackeray Attack on Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या एक ते दीड महिन्यात लागण्याची शक्यता आहे. अशातच राज्यातील सर्व पक्षाकडून तयारी केली जात आहे. आज उद्धव ठाकरे हे शिर्डी व मराठवाडा दौऱ्यावर आहेत. कोपरगाव येथील सभेत बोलताना त्यांनी महायुतीच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच वैजापुरातील लागलेला गद्दारीचा कलंक यंदाच्या निवडणुकीत पुसून काढा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ज्यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत बहीण कोण हे माहिती नाही, त्यांनी योजना आणली. पण राज्यातील बहिणींना प्रश्न पडला आहे, नेमकं भाऊ कोणाला म्हणायचं. श्रेय घेण्यासाठी सत्तेतील लोक मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ म्हणून प्रचार करत आहेत, पण हे सगळे फुकटे खाऊ आहेत, असा निशाणा ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीसांवर लगावला. कोपरगाव येथे जुनी पेन्शन संघटनेच्या अधिवेशनातून ते बोलत होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्या समोर येण्यापूर्वी साईबाबांचे दर्शन घ्यायला गेलो होतो. माझ्या बहिणींना आणि भावांना न्याय द्या, त्यांना ताकद द्या, असं साकडं घातलं. आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो. कारण तुमचा हा आक्रोश सरकारच्या कानी जात नाही. मी विचार करत बसलोय की, तुम्ही मला काय म्हणून बोलावलं? माझा येथे उल्लेख झाला की, माजी मुख्यमंत्री. पण माझा पक्ष चोरला. चिन्ह चोरलं आणि वडील देखील चोरले आहेत आणि तरी तुम्ही माझ्याकडून अपेक्षा व्यक्त करत आहात. पण मी तुम्हाला शब्द देतो, आपले सरकार आल्यावर पहिला निर्णय जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय घेतला जाईल.

मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही
मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही. माझा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही हाडा मासाची माणसं होय. माझी सत्ता तुम्ही सगळे आहात. ती कधीच कोणी घेऊ शकत नाही. तुमच्यामुळे महाराष्ट्र काम करतो. तुम्ही घराघरात जाऊन योजना राबवितात. त्यामुळे तुमची साथ महत्वाची आहे. लाडकी बहीण योजना आणली. मात्र, भाऊ कोणाला म्हणायचं हे बहिणींना कळत नाही. सगळे जण म्हणताय मीच तुझा भाऊ. हे सगळे फुकट खाऊ, अशी टीका उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर केली.
कॅबिनेट घेऊन घोषणासुद्धा करतील
फोडाफोडीचे राजकारण सत्ताधारी करणारच आहे. यांना पेन्शन दिले पाहिजे. आधी उपाशी आहात. त्यामुळे उपोषण करू नका. यांना सत्तेशिवाय उपोषणावर पाठवा एवढं काम करा. मिंधे आणि चमचे माझे भाषण बघतात. आपलं सरकार आलं तर तुमची मागणी मी मान्य करतो. मी वचन दिल्यावर यांना घाम फुटेल व कदाचित कॅबिनेट घेऊन घोषणासुद्धा करतील, असा टोला त्यांनी यावेळी शिंदे सरकारला लगावला.
मला सत्तेतून रिटायर कोणीही करु शकत नाही
आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये जर सरकारने पेन्शन योजनाची मान्य केली तर तुम्ही काय करणार? निवडणुकीला दोन महिने शिल्लक आहेत. तुम्ही जर आमचं सरकार आणलात तर मी तुमची मागणी मान्य करतो. ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली, जर हे स्वत:च्या शिवसेना या आईवर वार करु शकतात, हे तुमच्यावर वार करणार नाहीत का?, त्यामुळे मला हे सरकार नको आहे. माझं मुख्यमंत्री व्हायचंय स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही मला स्वप्न पडत नाहीत. मी सत्तेतून रिटायर होणार नाही. मला सत्तेतून रिटायर कोणीही करु शकत नाही. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात, तोपर्यंत मला कोणीही रिटायर करु शकत नाही, असेही ठाकरे म्हणाले.
वैजापूरच्या सभेत म्हणाले, गद्दारीचा कलंक पुसून काढायचा
उद्धव ठाकरे म्हणाले, संभाजीनगर लोकसभा मतदार संघात आपण हरलो आहे. त्याची रुखरुख मला अजूनही आहे. हा पराभव गद्दारांमुळे झाला. लोकांनी संभाजीनगरात धनुष्यबाणाला मतदान केले. कारण त्यांना वाटले धनुष्यबाण असलेली हीच शिवसेना खरी शिवसेना आहे. कारण त्यांनी बाळासाहेबांचे नावही चोरले होते. त्यामुळे धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे नाव पाहून ते मतदान झाले, परंतु आता घराघरात मशाल पोहचवा. विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.












Click it and Unblock the Notifications