उद्या महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद, उद्धव ठाकरेंनी भाजपा कार्यकर्त्यांना केले 'हे' आवाहन
मुंबई : महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. "हा बंद महाविकास आघाडीच्या वतीने नाही तर नागरिकांच्या वतीने पाळण्यात आला आहे. हा बंद दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे. तसेच बंदमध्ये बसेस आणि लोकल बंद ठेवल्या पाहिजे, बंदमधून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या आहेत." अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी तर विकृती विरुद्ध संस्कृतीचा बंद आहे. सगळ्याच पालकांना वाटतंय की आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहील का? महिलांना वाटतं की कामाच्या ठिकाणी आपण सुरक्षित राहू का? या खदखद किंवा अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी हा बंद आहे. विकृतीच्या विरोधकांनी पुकारलेला बंद आहे. नागरिकांच्या वतीने बंद पाळण्यात येत आहे राजकीय पक्ष, जात पात भेदाच्या कक्षा ओलांडून सहभागी व्हावं, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं. नराधमांच्या पाठिराख्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावलं.

काय सुरु, काय बंद?
उद्धव ठाकरे म्हणाले की, हा बंद दुपारपर्यंत असून या महाराष्ट्र बंद काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, रुग्ण्वाहिका, वृत्तपत्र, फायर ब्रिगेड चालू राहतील. सरकारला मी विनंती करतो की उद्या लोकल आणि बससेवाही बंद ठेवाव्यात, मात्र दहीहंडीचा सराव सुरु आहे, गणपती येत आहेत. त्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळावा. दुकानदारांनीही या काळात बंद पाळावा, कारण प्रत्येकाच्या घरात माताभगिनी आहेत. उत्सवातही मुलीबाळी सुरक्षित राहतील का, असा प्रश्न आहे.
मुख्यमंत्र्यांनाही लगावला टोला
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात. कारण त्यांच्या मते बहिणी या फक्त मते देण्यासाठी आहेत. बहिणीची किंमत ही मतं आहे. पण आमच्यासाठी बहीण हे नातं आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत. तुम्हाला वाटत असेल बहिणीची मते विकत घेऊ शकता, तर बहीण ही विकाऊ नाही.
हिंसा होऊ नये ही इच्छा
बंद दरम्यान कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये हा बंद शांततेत यशस्वी व्हावा, त्यामुळे पोलिसांनी या बंदच्या आड येऊ नये. राज्याच्या पोलीस महासंचालिका कदाचित पहिल्याच महिला पोलीस महासंचालिका असाव्यात. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची लाडकी बहीण बनण्याची संधी आहे. त्यांनी पोलिसांना उद्याच्या बंदच्या आड येऊ नका म्हणून सांगावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी केले.
कोर्टानेही ओढले ताशेरे
ठाकरे म्हणाले की, शाळेतील मुख्याध्यापिकेने प्रश्न केला की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील. कोर्टानेही काल बदलापूर प्रकरणावर ताशेरे ओढले आहेत, रोज अशा घटना घडत आहे. बदलापूरनंतर पुणे, लातूर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये अशा घटना घडल्या आहेत.
भाजप कार्यकर्त्यांनाही केले आवाहन
सरकारने वागू हट्टीपणाने वागू नये. उद्या जर बंदचा फज्जा उडवला तर लोक दोन तीन महिन्याने तुम्हाला उडवतील. तुम्ही कोणत्याही जातीचे, भाषेचे पक्षाचे असाल, भाजपचे असाल तरीही हा बंद कुटुंबीयांसाठी आहे. त्यात सहभागी व्हा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.












Click it and Unblock the Notifications