उद्धव आणि राज ठाकरेंचं भाषण किती वाजता? 'या' दिग्गजांची भाषणं होणार; जाणून घ्या A To Z माहिती
आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. तब्बल १९ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आज (५ जुलै २०२५) होणारा "विजयी मेळावा" या ऐतिहासिक मिलाफाचा साक्षीदार ठरणार आहे. राज्यातच नव्हे, तर दिल्लीपर्यंत या मेळाव्याकडे अत्यंत औत्सुक्याने पाहिले जात आहे.

या मेळाव्याची पार्श्वभूमी ठरली ती सरकारकडून शालेय शिक्षणात हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी घेतलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्रित लढ्याची. दोघांनीही या मुद्द्यावर एकत्र येत सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारले आणि अखेर शासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. या यशानंतर, ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आयोजित होणारा हा विजयी मेळावा केवळ जल्लोषापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्यातून पुढील राजकीय दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे.
या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या व्यासपीठावरून होणाऱ्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे हे शेवटचे वक्ते असतील. याशिवाय, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, प्रकाश रेड्डी आणि राज ठाकरे यांची भाषणे होणार आहेत. उपस्थिती लावणाऱ्या काँग्रेस नेत्यांनाही बोलण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन हाजी अलीपासून वरळी दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोमबाहेर मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात येणार असून, हजारो समर्थक बाहेरूनच कार्यक्रम पाहतील.
हा मेळावा फक्त आंदोलनाच्या यशाचा उत्सव नाही, तर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन पुढेही राजकीय समन्वय ठेवणार का, हा प्रश्न सर्वसामान्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात आहे. आगामी मुंबई महापालिका आणि अन्य महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे एकत्रीकरण केवळ भाषिक अस्मिता जोपासण्यासाठी आहे की राजकीय युतीचा प्रारंभ आहे, याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
एकनाथ शिंदे यांनी "जय गुजरात" दिलेल्या घोषणेमुळे आणि सुशील केडिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या वातावरण अधिकच तापलेले आहे. अशा स्थितीत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भाषणांतून या मुद्द्यांना कोणत्या प्रकारे उत्तर दिलं जातं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आजचा मेळावा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण म्हणून ओळखला जाईल, यात शंका नाही. हा फक्त भाषिक अस्मितेचा विजय नोंदवणारा मेळावा नाही, तर एक संभाव्य राजकीय वळण देणारा निर्णायक क्षण असू शकतो. ठाकरे बंधूंनी दिलेल्या संकेतांनुसार पुढे महत्त्वाचे राजकीय समीकरण जुळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.












Click it and Unblock the Notifications