मोठी राजकीय घडामोड: उद्धव आणि राज ठाकरे 6 महापालिका निवडणुका एकत्र लढणार!
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२७ नोव्हेंबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही बंधूंनी मुंबई महानगरपालिकेसह (बीएमसी निवडणूक २०२५) राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

या 6 महापालिकांमध्ये 'ठाकरे' युती निश्चित
राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट राज्यातील सहा महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये युती करणार आहेत. यात खालील महापालिकांचा समावेश आहे:
- बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)
- ठाणे महानगरपालिका
- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
- नवी मुंबई महानगरपालिका
- पुणे महानगरपालिका
- नाशिक महानगरपालिका
जागा वाटपाची जबाबदारी कोणावर?
- युतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेसाठी दोन्ही पक्षांनी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे:
- ठाणे महापालिका: शिवसेनेकडून (ठाकरे गट) खासदार राजन विचारे आणि मनसेकडून अविनाश जाधव.
- कल्याण-डोंबिवली महापालिका: शिवसेनेकडून (ठाकरे गट) आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेकडून माजी आमदार राजू पाटील.
मराठीबहुल भागातील जागांवर रस्सीखेच
युती निश्चित झाली असली तरी, मुंबईतील जागा वाटपावरून दोन्ही गटात तणाव दिसत आहे.
- मनसेची मागणी: मनसेने विशेषतः मराठीबहुल असलेल्या प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. सूत्रांनुसार, ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या २० ते २५ विद्यमान नगरसेवकांच्या जागा मनसे मागत आहे. यासोबतच शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांवरही मनसेचा दावा आहे.
- ठाकरे गटाची भूमिका: मनसेच्या या जोरदार मागणीमुळे ठाकरे गट काहीसा अडचणीत आला आहे. मात्र, ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, केवळ संघटनात्मक ताकद आणि निवडून येण्याची क्षमता पाहूनच उमेदवारांना जागा सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.
- चर्चेतील प्रमुख भाग: दादर-माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी यांसारख्या मराठी भाषिक मतदारांचे प्राबल्य असलेल्या भागांमधील प्रभागांसाठी जागा निश्चित करण्याचे काम सध्या सुरू आहे.
कालच्या पहिल्या भेटीत कोण कुठून लढणार यावर कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे निवडणुकीत उतरलेल्या प्रत्येक जागेवर सखोल चर्चा करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जागा वाटपाच्या पुढील काही फेऱ्या अपेक्षित आहेत.












Click it and Unblock the Notifications