एकनाथ शिंदेंचा सत्कार, शरद पवारांवर टीका; शिवसेनेने घेतला संजय राऊतांचा समाचार, म्हणाले- दुतोंडी...
Uday Samant and Naresh Mhaske criticism of Sanjay Raut : एखाद्या संस्थेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. त्या संस्थेला एकनाथ शिंदे यांचा नेतृत्व, कर्तृत्व पटले असेल. त्यांनी घेतलेले निर्णय योग्य वाटले. त्यांनी दिल्लीमध्येच एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्या मागेही काहीतरी कारण असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. विचार करुनच त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला असावा, असे म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. वास्तविक एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला, हीच त्यांची खरी पोटदुखी आणि पोटशूळ असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.
संमेलनामध्ये राजकारणातून वाद घालण्याचा हा प्रकार
साहित्य संमेलन आले की, अशा पद्धतीने वाद होतच असतात. मात्र साहित्यिकांनी कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण केला नाही, हेच या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. अतिशय उत्कृष्ट समन्वय साधून देशाच्या राजधानी मध्ये साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहेत. मात्र कोणीतरी वाद घालणारा पाहिजे, त्याच्या शिवाय साहित्य संमेलन गाजणार कसे? असा प्रश्न सामंत यांनी व्यक्त केला. साहित्य संमेलनामध्ये राजकारणातून वाद घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप देखील उदय सामंत यांनी केला आहे.

संजय राऊतांची खरी पोटशूळ कोणती?
सचिन प्रधान किंवा धर्मवीर आनंद दिघे यांचा कायमच एकनाथ शिंदे यांनी सन्मान केला आहे. मी देशाच्या नेत्याला कसे वागावे हे सांगायला लागलो, तर लोक त्या नेत्याची किंमत करणार नाही तर माझी किंमत करतील. शरद पवार हे गेली 56 वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात आहेत. त्यांना चांगले काय वाईट काय? हे माहिती आहे.
ते महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. देशाचे संरक्षण, अन्न, कृषी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीने विचार करूनच एकनाथ शिंदे यांचा सत्कार केलेला असेल. त्यामुळे यामध्ये कोणी कोणाचा सत्कार केला किंवा कोणत्या संस्थेने केला यापेक्षा एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला, हेच आरोप करण्यामागचे मूळ आहे. हीच संजय राऊतांची खरी पोटशूळ आहे, असा आरोप मंत्री उदय सामंत यांनी राऊतांवर केली.
राऊत स्वत:ला एवढे मोठे समजायला लागले का?
खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, संजय राऊत आता स्वतःला एवढे मोठे समजायला लागले आहेत की, ते आता शरद पवारांनी काय करावे आणि काय करू नये हे सुद्धा ते त्यांना सांगत आहेत. त्यामुळे यावर पवार साहेबांनी आपले मत व्यक्त करावे, असे मला वाटते. संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहे. ज्या आमदारांच्या मतावर निवडून आले आहेत, ज्यांनी त्यांना मतदान केले त्यांच्यावरच राऊत टीका करत आहेत. त्यांना एवढच वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
संजय राऊतांना वैफल्य आलंय
शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्राच्या एका सुपुत्राने दुसऱ्या सुपुत्राचा सन्मान केला यात चुकीचं काय? संजय राऊत म्हणायचे शरद पवारांमुळे महाविकास आघाडी झाली हे आतापर्यंत ते बोलत होते. आता संजय राऊत यांना वैफल्य आलं आहे त्यांचं स्थान दिवसेंदिवस खाली जायला लागलं आहे. त्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केलंय, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.












Click it and Unblock the Notifications