माहिमधून अमित, तर वरळीतून आदित्य ठाकरे लढणार; पण एकमेकांविरोधात उमेदवार देणार नाहीत..?
मुंबई : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यंदा 'एकला चलो रे'चा नारा देत आत्तापर्यंत सात विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. तर दुसरीकडे शिवतीर्थवर झालेल्या पक्षाच्या बैठकीत मनसे कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह राज ठाकरेंसमोर धरला. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर राज ठाकरे यांनीही येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करण्याची ग्वाही दिल्याचीही माहिती आहे.
अमित ठाकरे यांना माहिमधून उमेदवारी दिली तर, त्यांच्या विरोधात ठाकरे गट उमेदवार देणार नाही. पण त्याबदल्यात मनसेनेही, वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देऊ नये, अशा चर्चा आता रंगल्या आहेत. या चर्चांवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या पक्षाची सडेतोड भूमिका मांडत ठाकरे गटाला टोला लगावला.

अमित ठाकरे यांच्या उमेदवारीच्या चर्चा
अमित ठाकरे यांच्यासाठी माहीम हा मतदारसंघ सर्वात सेफ समजला जातो. मनसेची या मतदारसंघात चांगली ताकद आहे. त्यामुळे शिवतीर्थावरील बैठकीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीचा हट्ट राज ठाकरेंसमोर धरला. अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत राज ठाकरे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे यांची माहिममधून उमेदवारी फिक्स असल्याच्याही चर्चा आहेत.
मनसे-ठाकरे गटाच्या हातमिळवणीच्या चर्चा
राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी दिली, तर अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार देऊ नये, असा एक मतप्रवाह असल्याच्या चर्चाही मुंबईत रंगल्या. शिवाय त्या बदल्यात मनसेनेही वरळीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, अशाही चर्चा सुरु झाल्या. एकंदर मनसे व ठाकरे गटात या दोन मतदारसंघात हातमिळवणी झाली का? अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र या चर्चांमध्ये तथ्य नाही, असा दावा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
दरम्यान, एका चॅनलच्या बातमीनुसार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही चर्चा खोडून काढली. ते म्हणाले, अमित ठाकरे निवडणूक लढवणार की नाही, याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील. अजून निर्णय घेतलेला नाही. अमित ठाकरेंनी माहीमधून निवडणूक लढवल्यास ठाकरे गटाकडून या जागेवर उमेदवार देऊ नये आणि मनसेने देखील वरळीमधून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देऊ नये, अशी ठाकरे गटात सध्या चर्चा आहे.
मनसेचे नेते देशपांडे म्हणाले की, वरळीमध्ये ठाकरे गटाला भिती वाटू लागली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे प्रस्ताव सुचत आहे. जेव्हा आमचे अमित ठाकरे आजारी होते, तेव्हा आमचे सात नगरसेवक ठाकरे गटाने चोरले. गेल्यावेळी आम्ही वरळीत आदित्य ठाकरेंच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. तेव्हा आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती. मग आता ही बार्गेनिंग का? असा सवालही देशपांडे यांनी केला.












Click it and Unblock the Notifications