हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली होती; एसआयटीचे कोर्टात अनेक गंभीर दावे
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता पोलिस तपासात चांगलीच प्रगती दिसून येत आहे. यातील संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यनंतर आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. वाल्मिक कराडचा ताबा मिळावा, असा अर्ज एसआयटीने कोर्टात केला होता. त्याचीच आज सुनावणी झाली. या सुनावणीत एसआयटीने त्यांच्या तपासातील अनेक गंभीर दावे कोर्टासमोर सादर केले.

इन-कॅमेरा झाली सुनावणी
बीडच्या मकोका कोर्टात आज वाल्मिक कराडची सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टात न्यायाधिश, आरोपी, आरोपींचे वकील आणि तपास अधिकारी एवढेच लोक उपस्थित होते. ही सर्व सुनावणी कॅमेऱ्यासमोर करण्यात आली. सरकारी वकीलांनी वाल्मिक कराडला मकोका का लावण्यात आला, याची माहिती दिली. वाल्मिक कराडवर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत, याची यादीही तपासी अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर सादर केली.
एसआयटी काय म्हणते?
एसआयटीने कोर्टात आज एक गंभीर दावा केला. ते म्हणाले की, संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळी वाल्मिक कराडचे या प्रकरणातील इतर आरोपींसोबत फोनवर संभाषण झाले होते. संतोष देशमुखांचे 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3.15 वाजेच्या दरम्यान अपहरण झालं होते. एफआयआरमध्ये याच वेळेचा उल्लेख आहे. त्याच दिवशी दुपारी 3.20 मिनिटे ते 3.40 या वीस मिनिटांच्या काळात वाल्मिक कराडचं आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर संभाषण झाले. वारंवार या वीस मिनिटांत त्यांचे फोन झाले. त्यांच्यात जवळपास 10 मिनिटे संभाषण झाल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केला. वाल्मिक कराडने ज्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली होती, त्याच दिवशी त्यांचे अपहरण झाले असा दावाही एसआयटीने केला.
कराडच्या वकीलांचा युक्तीवाद
यावेळी वाल्मिक कराडच्या वकीलांनीही कोर्टात चांगलाच युक्तीवाद केला. कराडचे वकील म्हणाले की, वाल्मिक कराडचे नाव हत्येत संबंध असलेल्या कोणत्याही आरोपीने आत्तापर्यंत घेतलेले नाही. वाल्मिक कराड हत्तेत होते, याचा कोणताही पुरावा आत्तापर्यंत समोर आलेला नाही. फक्त आरोपींशी फोनवर बोलले म्हणून कुणी आरोपी होत नाही. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागूच शकत नाही. त्यामुळे ही अटक बेकायदेशीर आहे, असं वकिलांचं म्हणणं होतं.
न्यायाधिशांनी विचारले प्रश्न
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यावर न्यायधिकाशांनी तपासी अधिकारी व एसआयटीला काही प्रश्न विचारले. फक्त फोन कॉलवरुन आरोपीला दोन्ही गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आले आहे का? हत्या आणि खंडणी प्रकरणात फोन कॉलच्या बेसिसवर आरोपी बनवले आहे का? असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. न्यायाधीशांकडून तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. हत्येच्या गुन्ह्यात अटक करताना आरोपीचा सहभाग आहे याची खात्री केली होती का? असा देखील सवाल कोर्टाने केला.












Click it and Unblock the Notifications