संतोष देशमुखांच्या हत्येचं खरं कारण आत्ता समोर आलं; CID ने कोर्टात सांगितला हत्येचा सगळा घटनाक्रम
आवादा कंपनी, खंडणी, वाद, खून्नस आणि हत्या असा सगळा घटनाक्रम यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मांडला गेला होता. त्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली, हे अद्याप समोर आलेलं नव्हतं. मात्र आज सुनावणीदरम्यान सीआयडीनं त्यांचा तपास थेट कोर्टासमोर मांडला. त्यातून संतोष देशमुख यांची हत्या का झाली, याचं खरं कारण समोर आल्याचं सांगितलं जात आहे.

हत्येबाबत काय होत्या चर्चा?
या हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला ६ डिसेंबरला मस्सोजोगमध्ये मारहाण झाली होती. त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे फक्त खुन्नस व बदला घेण्यासाठीच ही हत्या झाल्याची प्राथमिक चर्चा होती. अनेकदा या हत्येबाबत आवादा कंपनीकडून मागितली गेलेली खंडणी व त्यानंतर घुले व देशमुख यांचे वाद, अशा कारणांचीही चर्चा झाली होती.
सीआयडीने काय सांगितलं?
आज बीडच्या न्यायालयात संतोष देशमुख हत्येबाबत वाल्मिक कराडला हजर करण्यात आलं. त्यावेळी एसआयटी व सीआयडीने आपापले मुद्दे मांडले. आजच्या सुनावणीत सीआयडीने कोर्टासमोर ९ मुद्दे मांडले. त्यातून या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम समोर आला. या नऊ मुद्यांमधून आवादा कंपनीकडे मागितलेली खंडणी हा महत्त्वाचा मुद्दा सीआयडीने मांडला.
हत्येचं नेमकं कारण काय?
हत्या प्रकरणातील आरोपींनी अवादा कंपनीकडे वारंवार खंडणी मागितल्याचा दावा सीआयडी व एसआयटीने कोर्टासमोर केला. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. संतोष देशमुखांनी अवादा कंपनीची बाजू घेत सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. त्यातूनच सुदर्शन घुलेला मारहाण झाली होती. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीने आणि एसआयटीने कोर्टात केला.
आवादा कंपनी काय म्हणते?
कंपनीला हा प्रकल्प उभा करण्यासाठी खंडणी मागितली जात होती, असा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांनी तर धमकी प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घेतलं होतं. वाल्मिक कराडने त्याच्या कार्यालयात बोलावून आपल्याला दोन कोटींची खंडणी मागितल्याचा दावा शिवाजी थोपटे यांनी केला होता. आवादा कंपनीच्या दाव्यावरून ही हत्या खंडणीत अडथळा ठरले म्हणूनच झाल्याचं सीआयडीनं कोर्टासमोर मांडलं.












Click it and Unblock the Notifications