मालवणमध्ये ठाकरे- राणे समर्थकांत राडा! लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पुतळा घाईघाईत बसवला - ठाकरे
लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पुतळा घाईघाईने बसवला आणि यातही महायुती सरकारनं भ्रष्टाचार केला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मालवण राजकोट इथं कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि नारायण राणे समर्थकात आज राडा झाला. यावेळी एकमेकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. यात एक पोलिस आणि महिला जखमी झाली. पाहता-पाहता या ठिकाणी राडा वाढला अन् दोन्ही नेते आमने-सामने आल्यानं एकच गोंधळ झाला.

दरम्यान या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. तर परिसरात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. काही झाले तरी माघार घेणार नाही, यावरून दोन्ही गट सध्या तरी ठाम आहे. त्यामुळं तणावाची स्थिती आहेय. यात मध्यस्थी काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील करत आहेत, मात्र त्यांना यात अपयश येत आहे.
बाजारपेठा बंद
आज सकाळी महाविकास आघाडीच्या वतीनं मालवण बंदची हाक देण्यात आली होती. त्याला मालवणमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला, यादरम्यान मालवणची पूर्ण बाजारपेठ आज बंद होती. सकाळी मोर्चाला सुरुवात झाली, या मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील हे सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि भाजप नेते निलेश राणे तसंच त्यांचे समर्थक राजकोट इथं एकमेकांसमोर आले अन् दोन्ही बाजूने एकच दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून सध्या मालवणमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
1 सप्टेंबरला 'गेट वे' इथं जोडे मारो आंदोलन
मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ रविवार, एक सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया इथं महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. आज यासंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुंबईतील हुतात्मा चौकात महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी एकत्र जमून तेथून गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केलं आहे.
हे सरकार निर्ढावलेले - ठाकरे
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं. हे सरकार निर्ढावलेलं आहे. पुतळा वाऱ्यानं पडला हे कारण यथायोग्य नाही. लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा पुतळा घाईघाईनं बसवण्यात आला. सरकारनं या कामात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
सरकारचा भ्रष्टाचार टोकाला गेला - शरद पवार
याच पत्रकार परिषदेत शरद पवार यानी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारमधील भ्रष्टाचार किती टोकाला गेलाय हे या घटनेवरून दिसतं याबद्दल लोकांच्यात तीव्र भावना असल्यामुळं आम्ही हे आंदोलन करणार आहोत असंही ते म्हणाले. तर केवळ रविवारीच हे आंदोलन होईल अस नसून येत्या दोन तारखेपासून राज्यभर प्रत्येक गावागावात हे निषेध आंदोलन होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications