ठाकरेंचे २२ नगरसेवक फोडण्यासाठी शिंदेंचा मोठा प्लॅन, मुंबईत काय घडतयं?
मुंबईत शिवसेना (ठाकरे गट)ला मोठा धक्का बसण्याची चिन्हं दिसत आहेत. मुंबईतील ठाकरे गटाचे दोन महत्त्वाचे माजी नगरसेवक अजित भंडारी आणि संजय जंगम शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे कालच दोघंही मातोश्री येथे पार पडलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला हजर होते. त्यानंतर लगेचच त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही राजकीय उलथापालथ मोठा संदेश देत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी थेट शिंदे गटावर गंभीर आरोप करत सत्तेच्या जोरावर 'खरेदीचे राजकारण' केल्याची टीका केली आहे.
२२ नगरसेवकांना आमिष दाखवलं जातंय
विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, "२२ नगरसेवकांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडे सांगितलं की त्यांना आमिष दाखवण्यात येत आहे. त्यांना शिंदे गटात सामील होण्यास सांगितलं जात आहे. बाजारात शिंदे गटाचे काही 'दलाल' फिरत असून ते आमचे माजी नगरसेवक शोधून भेटत आहेत." राऊत यांनी असा आरोप केला की, "दुसऱ्यांच्या लोकांना विकत घेऊन स्वतःचा पक्ष चालवायचा हेच त्यांचं धोरण आहे."
त्यांनी असेही सूचित केले की, "या बैठकीला आलेले काही लोक आधीच निर्णय घेऊन आले होते, फक्त उद्धव ठाकरे काय बोलतात हे ऐकण्यासाठी ते हजर होते."
शिंदे नपुंसक राजकारणी, विनायक राऊतांची जहाल टीका
राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका करताना म्हटलं की, "शिंदे हे नपुंसक राजकारणी आहेत. त्यांच्यात स्वतःचा कार्यकर्ता घडवण्याची क्षमता नाही. मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्यातील एक अधिकारी - निमेश रेवडेकर - हा त्यांच्या वतीने अनेक माजी नगरसेवकांच्या घरी जातो, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क करतो आणि म्हणतो, 'साहेब तुमचं आयुष्य बदलून टाकतील'."
आमचं राजकारण नैतिकतेवर, आम्ही कोणालाही विकत घेत नाही
ठाकरे गटाकडून सत्तेच्या आणि पैशाच्या राजकारणाला विरोध करत राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे कोट्यवधींचं आमिष देत नाहीत आणि आमचे दलाल बाजारात फिरत नाहीत. आज केवळ एक माजी नगरसेवक आणि एक शाखाप्रमुख गेला असला तरी उद्धव ठाकरे हेच खऱ्या शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखालीच वर्धापन दिन साजरा होतो."
शिंदे गटाचे 'तुडतुड्यांचे नाटक'
राऊत यांनी शिंदे गटाच्या हालचालींना 'तुडतुड्यांचे नाटक' असं संबोधत त्यांच्यावर उपहासात्मक हल्ला चढवला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "खरेदी करून राजकारण करणाऱ्यांना दीर्घकालीन यश मिळणार नाही. एकनाथ शिंदे यांना जनतेच्या मनात स्थान निर्माण करता आलेलं नाही, म्हणूनच ते आजही फोडाफोडीच्या मार्गाने सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत."
या सर्व राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेच्या मुंबईतील सत्ताकारणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.












Click it and Unblock the Notifications