शिवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा; 'मुंबई महापौर मराठी'च्या गर्जनेवर भाजपचा कवितेतून खोचक टोला!
Thackeray brothers alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या क्षणाची गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती, तो ऐतिहासिक क्षण अखेर आज प्रत्यक्षात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. "मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत," असे जाहीर करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ललकारले आहे.

'मराठी कार्ड' आणि विजयाचा एल्गार
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत युतीवर शिक्कामोर्तब करताना अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, "मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमच्या युतीचाच असेल." मराठी माणसाने या युतीला खंबीर पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. दोन भावांच्या एकत्र येण्याने मुंबईच्या राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलणार असून, मराठी मतांचे विभाजन थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपची प्रतिक्रिया- "आम्ही काय लंडनमधून आलोय?"
ठाकरे बंधूंच्या या युतीवर भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या युतीला 'भावनिक राजकारण' असल्याचे म्हटले आहे. बावनकुळे यांनी उपस्थित केलेले काही महत्त्वाचे मुद्दे:
विकासाचा मुद्दा : "महाराष्ट्र आणि मुंबईचा खरा विकास फक्त देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच करू शकते. येथे भावनिक आवाहने चालणार नाहीत."
मराठी अस्मितेवर प्रश्न : "आम्ही सगळे मराठीच आहोत, काय लंडनमधून आलो आहोत का? महायुतीतही सर्व मराठीच आहेत. मराठीच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांनी यापूर्वी मराठीचा आणि सावरकरांचा अपमान केला आहे."
सरड्याची उपमा : राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करताना त्यांनी "सरड्यासारखे रंग बदलणारे राजकारण" अशा शब्दात टोला लगावला.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा
मंत्री बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी म्हटले की, "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारांसाठी आयुष्य वेचले, त्या विचारांशी उद्धव ठाकरेंनी तडजोड केली आहे. धाराशिव आणि नाशिकच्या विजयाचा संदर्भ देत त्यांनी गंभीर आरोप केले की, उद्धव ठाकरेंच्या विजयानंतर पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले, जे दुर्दैवी आहे. "पायाखालची जमीन सरकल्यामुळेच आता ही युती झाली आहे. शिंदे साहेबांकडे लोक जात आहेत कारण तिथे कामाची पावती मिळते," असेही बावनकुळे म्हणाले.
कवितेतून लगावला टोला!
भाजपच्या नेत्यांनी केवळ टीकेवर न थांबता, राजकारणातील या नव्या बदलावर कवितेच्या माध्यमातून तिरकस भाष्य केले. "सत्तेसाठी सोबती बदलतात, पण जनतेची मने जिंकण्यासाठी केवळ नात्याची नाही तर विश्वासाची गरज असते," अशा आशयाची कविता सादर करत भाजपच्या मंत्र्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला 'केवळ औटघटकेची मैत्री' असल्याचे सूचित केले.
ठाकरेंच्या युतीवर शेलार यांची कवितेतून प्रतिक्रिया
घेरलं होतं मातोश्रीवरील "विठ्ठलाला" बडव्यांनी..
तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी...
एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचे नव्हते "भागीदार"
सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केले होते खुमासदार !
आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का?
त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का?
"लाव रे तो व्हिडीओ" असे आता मुंबईकर म्हणतील
तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील!
तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार?
एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार?
मुंबईकर गल्लोगल्लीत तुम्हाला विचारणार...
"नेमके कशासाठी झाला होतात त्यावेळी वेगळे?"
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"












Click it and Unblock the Notifications