"दोन गुजराती आपल्याला गिळायला निघालेत, आता तरी सावध व्हा!"; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
Uddhav Thackeray attack on BJP : अनेक वर्षांची प्रतीक्षा, राजकीय उलथापालथ आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न... अखेर १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने 'ठाकरे' बंधू एकत्र आले आहेत. मुंबईसह राज्यातील महापालिकांचे रणशिंग फुंकले गेले असताना, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. "दोन गुजराती आपल्याला गिळायला निघाले असताना आपण जर 'तुझं-माझं' करत बसलो, तर ही लढाई न लढलेलीच बरी," अशा शब्दांत त्यांनी शिवसैनिकांना संघर्षाची नवी दिशा दिली.

'आम्ही मोठे केले आणि त्यांनीच आमचा घात केला'
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे यांचा आवाज कमालीचा आक्रमक होता. ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि खेडोपाडी भाजपला कुणी ओळखत नव्हते. आम्ही त्यांना हाताला धरून महाराष्ट्र दाखवला, त्यांना मोठे केले. पण आज तेच लोक आम्हाला संपवायला निघाले आहेत. ज्यांनी केवळ आपला उपयोग करून घेतला, त्यांना आता धडा शिकवण्याची आणि त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे."
'निष्ठा विकू नका': कार्यकर्त्यांना भावनिक साद
मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील ऐतिहासिक युतीबाबत बोलताना त्यांनी वास्तववादी भूमिका मांडली. युतीमध्ये काही जागा सोडाव्या लागतात, हे मान्य करत त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले.
"मला माहिती आहे, काही ठिकाणी आपल्या हक्काच्या जागा मित्रपक्षाला सोडाव्या लागल्यामुळे नाराजी असेल. पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मी हा वाईटपणा घ्यायला तयार आहे. तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका. ही वेळ खुर्चीची नाही, तर काळीज दाखवण्याची आहे."
'माझ्या खुर्चीत बसून बघा, मग जबाबदारी कळेल'
काही ठिकाणी होणाऱ्या अंतर्गत नाराजीवर बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले. "एकदा माझ्या खुर्चीत बसून बघा आणि समोरच्या चार माणसांना निवडून दाखवा, म्हणजे जबाबदारीचे ओझे काय असते हे समजेल," असे म्हणत त्यांनी विभागप्रमुखांना आणि शिवसैनिकांना ताकद विखुरली जाऊ देऊ नका, अशी तंबी दिली. "माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी जगाच्या नजरेत वाईट ठरलो तरी चालेल, पण आपला एकही माणूस फुटता कामा नये," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुंबईवर भगवाच फडकणार: मराठी अस्मितेचा हुंकार
या युतीचा केंद्रबिंदू 'मुंबई' आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा मराठी माणसाचाच महापौर बसेल. उद्धव ठाकरेंनीही याला दुजोरा देत सांगितले की, मुंबई कोणाही परक्याच्या हातात हिसकावू दिली जाणार नाही. मुंबईवरील मराठी माणसाचे वर्चस्व टिकवून ठेवणे, हेच या 'ठाकरे युती'चे मुख्य उद्दिष्ट आहे.












Click it and Unblock the Notifications