महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! अखेर 'ठाकरे बंधू' एकत्र;उद्या दुपारी 12 वाजता युतीची अधिकृत घोषणा!
Uddhav Thackeray Raj Thackeray alliance : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि बहुप्रतीक्षित बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची शिवसैनिक आणि मनसे सैनिक वाट पाहत होते, तो क्षण अखेर जवळ आला आहे.
शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Uddhav Thackeray Raj Thackeray alliance) आगामी महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून, उद्या 24 डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता या ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली.

संजय राऊत यांचे ट्विट आणि मुहूर्ताची निश्चिती!
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून या युतीबाबत अधिकृत माहिती दिली. राऊत म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जेव्हा वरळीच्या डोममध्ये एकत्र आले, तेव्हाच या युतीवर शिक्कामोर्तब झाले होते. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे." उद्याच्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेते संयुक्तपणे जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्याची शक्यता आहे.
उद्या
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025
१२ वाजता
हॉटेल ब्लू सी
वरळी pic.twitter.com/k2O590ftO4
जागावाटपाचा तिढा सुटला: मुंबईसह प्रमुख शहरांवर लक्ष
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) नेत्यांमध्ये जागावाटपाच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. काल रात्री या चर्चेवर शेवटचा हात फिरवण्यात आला असून आता कोणताही विसंवाद उरलेला नाही.
मुंबई महापालिका: मुंबई महापालिकेसाठी दोन्ही पक्षांनी विशेष रणनीती आखली असून जागावाटप निश्चित झाले आहे.
इतर शहरे : नाशिक, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मिरा-भाईंदर यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमधील जागावाटपाचा विषयही पूर्णतः संपलेला आहे.
कार्यकर्त्यांचे मनोमिलन : नेत्यांच्या आधीच कार्यकर्त्यांनी ही युती स्वीकारली असून, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आता एकत्र कामाला लागले आहेत.
महाविकास आघाडीचे काय?
ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीमुळे महाविकास आघाडीच्या गणितांमध्येही बदल होताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) : शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असून आमदार जयंत पाटील हे उद्धव ठाकरेंसोबत संपर्कात आहेत. ही युती व्यापक होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची भूमिका : काँग्रेसबाबत तूर्तास 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेण्यात आली आहे. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, सध्या काँग्रेससोबतचा विषय बंद असला तरी चर्चेची दारे उघडी आहेत. काँग्रेसने नगरपालिकेत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी अभिनंदनही केले.
राजकीय समीकरणे का बदलली?
वरळीच्या डोममध्ये दोन भाऊ एकत्र येणे हा केवळ कौटुंबिक सोहळा नव्हता तर तो एका मोठ्या राजकीय बदलाचा पाया होता.
मराठी मतांचे विभाजन टाळणार
मुंबई आणि ठाणे पट्ट्यात मराठी मतांचे विभाजन टाळून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला रोखणे, हा या युतीचा मुख्य उद्देश आहे.
ठाकरेंची ताकत
राज ठाकरेंची आक्रमक शैली आणि उद्धव ठाकरेंचे संघटन कौशल्य एकत्र आल्यास महापालिकेत सत्ता मिळवणे सोपे जाईल, असा विश्वास दोन्ही पक्षांना आहे.












Click it and Unblock the Notifications