विशाळगड अतिक्रमण हटाव कारवाईवरून वातावरण तापले
कोल्हापूर : सिद्दी जोहरचा वेढा पन्हाळ्याला पडला तेव्हा महाराज त्याला चकवून विशाळगडावर गेले. शेकडो मावळ्यांनी महाराजांचे प्राण वाचविण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली. पावनखिंड मराठ्यांच्या बलिदानाने पावन झाली. तो विशाळगड म्हणजे शिवप्रेमींचे श्रद्धास्थान.

मात्र विशाळगड अलीकडे अतिक्रमणांच्या वेढ्याने ग्रस्त झाला होता. स्वराज्यासाठी लढणाऱ्या शिवरायांच्या विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी शिवप्रेमींकडून सातत्याने करण्यात येत होती. कालपासून ही अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली. पहिल्या दिवशी ७० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या मोहिमेच्या दरम्यान तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला. त्यानंतर आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालीय. ईंडी आघाडी आणि एमआयएम देखील या वादात उतरली आहे.
विशाळगड येथील अतिक्रमण हटाव कारवाई वरून वातावरण चांगलेच तापले आहे. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी घडल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केलीय. विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमिताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून, घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे, असे म्हणत खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी या घटनेचा निषेध करत नाराजी देखील व्यक्त केली आहे. अतिक्रमण हटाव आंदोलनाचे नेतृत्व करणारे युवराज संभाजी महाराज आणि घटनेचा निषेध करणारे खासदार शाहू महाराज या पितापुत्राच्या भूमिका विसंगत असल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरलाय.
ईंडी आघाडीच्या नेत्यांनी विशाळगड येथील नुकसानग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय तर एमआयएम पक्षाच्या वतीने कोल्हापुरात मोर्चा काढणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलय. विशाळगड येथे झालेल्या घटनेचा खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी निषेध केला असून ईंडी आघाडीचे नेते विशाळगड येथे रवाना झाले. छत्रपती शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांना विशाळगड येथे जाण्यापासून पोलिसांनी रोखले. अन्याय झालेल्यांना मदत करणे आपले कर्तव्य असल्याची भूमिका शाहू महाराज यांनी मांडली.
विशाळगड परिसरात अशांतता निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केलेत. युवराज संभाजीराजे यांचाही त्यात समावेश आहे. मला अटक करा मात्र कार्यकर्त्यांना अटक करू नका, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे. विशाळगड अतिक्रमण हटाव आंदोलनाचे नेतृत्व करणारे युवराज संभाजी महाराज हे शाहू महाराज यांचे वंशज आहेत का, असा सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. विशाळगड येथे अशांतता निर्माण करणाऱ्या रोकःण्यात पोलीस अपयशी का ठरले, त्यांचे हात कुणी बांधले होते, असा सवाल देखील जलील यांनी केला आहे.












Click it and Unblock the Notifications