भाजप प्रभावित मुंबई जिल्हा बँकेत तेजस्वी घोसाळकर यांची संचालकपदी नियुक्ती; पक्षांतराची चर्चा रंगली
शिवसेना (ठाकरे गट)च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रवक्ते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे तेजस्वी घोसाळकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

याआधी या संचालकपदावर तेजस्वी यांचे पती, स्व. अभिषेक घोसाळकर कार्यरत होते. त्यांच्या हत्येनंतर सद्भावनेच्या दृष्टीने त्यांच्या पत्नीला संधी देण्यात आली असल्याचं दरेकर यांनी सांगितलं. परंतु भाजपप्रभुत्व असलेल्या बँकेने अशा परिस्थितीत नियुक्ती केल्यामुळे तेजस्वी घोसाळकर ठाकरे गटातून बाहेर पडणार का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एकमताने निवड, पण पक्षांतरणाचा संकेत?
मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सर्व सदस्यांनी एकमताने तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाला मंजुरी दिली. या निवडीबाबत बोलताना अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी सांगितलं की, "रिक्त जागा भरली जाणं आवश्यक होतं आणि ही नियुक्ती केवळ सहवेदनेतून करण्यात आली आहे."
मात्र गेल्या काही महिन्यांपासून तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. संचालकपदाच्या मागणीसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील होत्या, त्यामुळे ही नियुक्ती भाजप प्रवेशाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल मानलं जात आहे.
दरेकरांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना दरेकर म्हणाले, "मराठी मतदारांचा पाठिंबा मिळणं ही ठाकरे गटाची खासियत उरलेली नाही. हा पाठिंबा आता भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने वळलाय."
ते पुढे म्हणाले, "मराठी माणसांचा विश्वास उद्धव ठाकरेंवर राहिलेला नाही. उलट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा अधिक विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसा आणि ब्रँड भाजप आणि शिंदे गटाकडे आहे."
त्यांनी ठाकरेंवर टीका करत म्हणाले की, "बाळासाहेबांनी उभा केलेल्या पक्षाच्या नेतृत्वाची सध्याची स्थिती हतबलतेची आहे. बाळासाहेबांचा प्रभाव आणि विचार पुढे नेण्याचं काम आज शिंदे गट करत आहे."
तेजस्वी घोसाळकर यांची संचालकपदी निवड ही केवळ सहवेदनेचा भाग आहे की भाजप प्रवेशाच्या दिशेने रणनीतीचा एक टप्पा हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र या घडामोडींमुळे ठाकरे गटात अस्वस्थता आहे, आणि मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications