जो CMपदाला नडला, तो...!', तावडे, पंकजांचा दाखला अन् थेट मोहोळांना सवाल 'तेरा क्या होगा रे मुरली?
Sushma Andhare Targets Murli Mohol : पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री व्यवहारावरून भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांची राळ उठली असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या वादाला थेट भाजपच्या अंतर्गत राजकारणाची जोड दिली आहे.
सुषमा अंधारे यांनी ट्विट करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राजकारणामुळे भाजपमधील काही मोठे नेते कसे बाजूला पडले, याचा दाखला देत, मुरलीधर मोहोळ यांना सूचक इशारा दिला आहे.
'जो नडला, तो फोडला' - फडणवीस आणि अंतर्गत राजकारण
सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची एक यादीच सादर केली, ज्यांना कथितरित्या मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेमुळे किंवा विरोधाभावामुळे त्रास झाला. विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, ते चंद्रकांत पाटील यांनी तर 'कानाला खडा लावला आहे' आणि नितीन गडकरी यांनी 'सौजन्यपूर्ण माघार घेतली आहे', असेही त्यांनी नमूद केले.

मुरली मोहोळ यांना थेट इशारा: 'अब तेरा क्या होगा रे मुरली?'
या यादीच्या आधारावर सुषमा अंधारे यांनी थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केले. भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा संदर्भ देत, त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना विचारले: "अब तेरा क्या होगा मुरली ?"
सुषमा अंधारे यांनी आपले हे ट्विट थेट मुरलीधर मोहोळ यांना टॅग केले आहे. तसेच, त्यांनी #सिंहासन आणि #सारेकाहीखुर्चीसाठी असे हॅशटॅग वापरले आहेत, ज्यामुळे या आरोपांना राजकीय महत्त्वाकांक्षेच्या संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री पदाला
— SushmaTai Andhare (@andharesushama) October 26, 2025
जो नडला तो फोडला
सगळ्यात आधी विनोद तावडे
मग पंकजा मुंडे
पाठोपाठ सुधीर मुनगुंटीवार
चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय..
गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतलीय...
...... अब तेरा क्या होगा मुरली ?@mohol_murlidhar @BJP4Maharashtra
#सिंहासन…
जैन बोर्डिंग प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
यापूर्वीही सुषमा अंधारे यांनी जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणावर लक्ष केंद्रित केले होते. तीन दिवसांपूर्वी त्यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या शनिवार वाड्यावरील मोर्चाची खिल्ली उडवली होती. त्यांच्या मते, जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
मोहोळ यांनी साधला जैन मुनींशी संवाद
दरम्यान, या राजकीय आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारी मुरलीधर मोहोळ यांनी शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगला भेट दिली.
मोहोळांनी दिले आश्वासन!
तिथे त्यांनी आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांच्यासह समाज बांधवांशी संवाद साधला. ते जैन बांधवांसमवेत सदैव असून, येत्या १ तारखेपर्यंत समाजाची मागणी पूर्ण करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications