'माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम?'; सुप्रिया सुळेंनी भरसभेत सुनावलं
Supriya Sule mutton comment : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिंडोरी येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. तर त्यांच्यावर सातत्याने होणाऱ्या मटन खाण्याच्या टीकेवर देखील त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला.
मटण आणि पुरोगामित्व
सुप्रिया सुळे यांनी 'मटण खाल्ले म्हणून वाद निर्माण करणाऱ्यांवर' सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, "माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम?" त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही.
या विधानाद्वारे त्यांनी स्वतःला पुरोगामी विचारांची असल्याचे दर्शवले. त्यांनी शरद पवार यांचे उदाहरण देत सांगितले की, "५० वर्षांपूर्वी शरद पवार एका मुलीवर थांबले. स्वतःचं ऑपरेशन केलं, मात्र पत्नीचे नाही, हे खरं पुरोगामित्व आहे."

मुख्यमंत्र्यांवर टीका, अमित शहांचे आभार
सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वेळ न दिल्याबद्दल टीका केली. त्यांनी म्हटले की, "मी दहा वेळा वेळ मागूनही मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. म्हणून आम्ही थेट दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतो." त्यांनी अमित शहा यांचे जाहीर आभारही मानले. यावरून, राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने केंद्राकडून मदत घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सूचित केले.
'लाडकी बहीण योजने'वर घोटाळ्याचा आरोप
सुळे यांनी सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या, "या योजनेत ४ हजार ८०० कोटींचा मोठा घोटाळा झाला आहे. २५ लाख लाडक्या बहिणींची नावं सरकारने कमी केली आहेत. हजारो पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज कसे भरले?" या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
'कॉपी करून निवडून येणे' आणि विकासकामांवरील टीका
निवडणूक आयोगावर अप्रत्यक्षपणे टीका करताना त्या म्हणाल्या, "निवडून आलो की नाही हे आम्ही आता निवडणूक आयोगाकडून चेक करून घेणार आहोत." त्यांनी 'एका घरात १८८ लोक कसे राहू शकतात' असा सवालही केला. तसेच, "झिरवाळ साहेब तुम्ही मंत्री नाही प्रधानमंत्री झालात तरी आम्हाला आनंद आहे, मात्र, कॉपी करून निवडून येण्यात काय अर्थ आहे" अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला केला.
विकासकामांवर बोलताना, "मोठा समृद्धी महामार्ग झाला, पण माझ्या गावाचा रस्ता झाला नाही हे महत्त्वाचं आहे." असे म्हणत त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, रोहित पवार यांना वारंवार येणाऱ्या नोटिसांवर त्यांनी, "आमचा रोहित घाबरत नाही," असे सांगत धीर दिला.












Click it and Unblock the Notifications