अजितदादांच्या निधनानंतर NCPची धुरा कोणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावासाठी प्रस्ताव; तटकरे म्हणाले...
Sunil Tatkare statement on Sunetra Pawar Deputy CM : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्याप सुतकात आहे. मात्र, या धक्क्यातून सावरत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आणि रिक्त झालेले उपमुख्यमंत्रिपद कोणाकडे जाणार, या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली असून, पक्षाचा कोणताही निर्णय हा 'पवार' परिवाराच्या संमतीशिवाय होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

"पवार परिवाराचा निर्णय अंतिम" : सुनील तटकरे
राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तटकरे भावूक झाले होते. "अजितदादांच्या जाण्याने आम्हाला बसलेला धक्का इतका मोठा आहे की, राष्ट्रवादीच्या कार्यालयात येणेही आता क्लेषकारक वाटतेय," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांशी झालेली भेट ही केवळ औपचारिक होती, त्यात उपमुख्यमंत्रिपदावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवारांची भूमिका
सध्या सुनेत्रा पवार आणि त्यांचा परिवार धार्मिक विधींमध्ये व्यस्त आहे. हे विधी पूर्ण झाल्यानंतर सुनील तटकरे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतील. आमदार आणि जनतेच्या भावना जाणून घेऊनच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे तटकरे म्हणाले.
पार्थ पवारांचा 'तो' प्रस्ताव आणि राजकीय समीकरणे
या संपूर्ण घडामोडीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी मांडलेला प्रस्ताव सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांनी पक्षाच्या नेत्यांसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार, सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्यात यावे, तर स्वतःला राज्यसभेवर पाठवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विधीमंडळ गटनेता
उद्या होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत विधीमंडळ प्रमुखाची (गटनेता) निवड केली जाईल. जर एकमत झाले, तर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.
शपथविधी आणि पुढील प्रक्रिया
छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक लवकरच पार पडणार आहे. या बैठकीनंतर पुढील प्रक्रिया जलद गतीने पार पडण्याची शक्यता आहे. उद्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बारामतीला जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतील. सुनेत्रा वहिनींशी चर्चा झाल्यानंतर सर्व आमदारांची बैठक बोलावली जाईल. त्यात गटनेता निवडीचा आणि उपमुख्यमंत्रिपदाचा अधिकृत प्रस्ताव मांडला जाईल.
राज्यपालांना पत्र
आमदारांच्या संमतीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले जाईल आणि त्यानंतर राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला जाईल. राज्यपालांच्या संमतीनंतर पुढील २ ते ३ दिवसांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
भावनिक साद की राजकीय गरज?
अजितदादांनी ज्या कष्टाने पक्षाचे संघटन उभे केले, त्या वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार हे नाव सध्या पक्षात सर्वमान्य मानले जात आहे. अजितदादांच्या अनुपस्थितीत पक्ष एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे. सुनेत्रा पवार यांना पद देऊन कार्यकर्त्यांमधील 'भावनिक ओढ' कायम राखण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसतोय.












Click it and Unblock the Notifications