सरकार आणि संघटना या दोघांनाही फडणवीस यांची आवश्यकता
Mumbai: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळ होण्याची मनीषा व्यक्त केली असली, तरी राज्य भाजपातील नेते फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. फडणवीस यांची सरकार आणि संघटना या दोघांनाही आवश्यकता असल्याचे मत नेते व्यक्त करतायत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही ठिकाणी कार्यरत राहण्याचा आग्रह केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार तसेच मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.

काय आहे रवींद्र चव्हाण यांची पोस्ट
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एक पोस्ट लिहून आपले मार्गदर्शन सरकारमध्ये आणि पक्षात दोन्ही ठिकाणी हवे आहे. आमच्या विनंतीला मान द्यावा, असे साकडे फडणवीस यांना घातलय. "देवेंद्रजी, आपण नैतिक कर्तव्यबुद्धीने लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या अनपेक्षित कामगिरीची जबाबदारी स्वीकारली, ती वंदनीयच आहे.
साहेब, नम्रपणे एक सांगतो.... ती जबाबदारी आपली एकट्याची नसून संपूर्ण भाजपा टीमची होती. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात खोलवर एक जखम झाली आहे, प्रत्येकाच्या मनात एक सल लागून राहिली आहे आणि त्यातूनच सामूहिक जबाबदारीची जाणीवही तीव्रपणे होत आहे.
म्हणूनच आमच्या प्रत्येकाच्या मनात या अनपेक्षित कामगिरीने संघर्षाची एक ठिणगी प्रज्वलित केली आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यालाही या अपेक्षाभंगाची जबाबदारी घ्यायची आहे. पुन्हा पेटून यशाचं शिखर गाठण्यासाठी
साहेब, भाजपा विचारधारेचा सच्चा कार्यकर्ता हीच आपली प्रत्येकाची ओळख सर्वोच्चस्थानी आहे, त्यासाठी आपण सर्वच जण वचनबद्ध आहोत. विचारधारेचा स्वयंसेवक म्हणून आपल्याला नम्रपणे विनंती करतो आम्हाला आपले मार्गदर्शन सरकारमध्ये आणि पक्षात दोन्ही ठिकाणी हवे आहे. आमच्या विनंतीला मान द्यावा ही कळकळीची विनंती..." असं चव्हाण यांनी आपल्या पोस्ट मध्ये नमूद केलंय.
रक्षा खडसेंनीही केली विनंती
रक्षा खडसे यांनीही तशीच जाहीर विनंती केलीय. "आत्मविश्वास बाळगू, संयम ठेवू. वायफळ चर्चा आणि अफवा यांच्यात न गुंतता नवीन विश्वासाने आपल्याला महाराष्ट्रासाठी झटायचे आहे. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये आणि मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पक्ष खंबीरपणे उभा राहणार आहे. स्व. अटलजींच्या शब्दांचा आधार घेऊन मी शेवटी एकच खात्री देईन "अंधेरा हटेगा, कमल खिलेगा" असा संदेश भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी दिला आहे.
गुरुवारी रात्री फडणवीस आणि अमित शाह यांचीही भेट झालीय. त्यामुळे भविष्यात काय घडणार, याची उत्सुकता आहे.












Click it and Unblock the Notifications