आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतील की घाबरुन दुसरा मतदारसंघ शोधतील? श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Mumbai: विरोधकांनी जनतेमध्ये खोटा नरेटिव्ह पसरवला. तो नॅरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही. संविधान धोक्यात आहे, संविधान वाचवा अशा सगळ्या खोट्या गोष्टी विरोधकांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि लोकांनी त्याला बळी पडून मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं, असं विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं.
कल्याणमधील आचारी अत्रे रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे खासदार श्रीकांत शिंदे , खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले या निवडणुकीत विरोधकांचा खोट्या नरेटिव्हमुळे विजय झाला असेल. मात्र ही टेम्परेरी गोष्ट आहे, ही पर्मनंट अरेंजमेंट नाही. इतर लोकांची दिशाभूल करून लोकांचे मतदान मिळवले असा आरोपही श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.
आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका
श्रीकांत शिंदे यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरेंना उद्देशून शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात 40 हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असं त्यांना वाटत होतं. मात्र लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. वरळी मतदारसंघात फक्त ६ हजार मताधिक्य मिळालं.
मराठी माणूस त्यांच्यासोबत आहे असं त्यांना वाटत होतं. मात्र मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या म्हणजे धनुष्यबाणाच्या आणि बाळासाहेबांच्या बाजूने उभा राहिला असं शिंदेंनी यावेळी सांगितलं.
तसेच 19% जे मतदान शिवसेनेला होत होतं त्यातील साडेचौदा टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला धनुष्य बाणाला पडलं असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
आदित्य वरळीतून लढणार की...
वरळीत कमल फुलणार नाही असं विधान काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं होतं. या विधानाचा श्रीकांत शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले, पुढच्या वेळेस आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की नाही तोच एक मोठा प्रश्न आहे, नाहीतर घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात की काय हे पहावं लागणार असल्याचा टोला शिंदेंनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
पैसे वाटपाचा आरोप फेटाळला
लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीन मैदानात उतरले आहेत.
यावर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्याच लोकांकडून पैसे वाटण्याचे काम चालू आहे असा पलटवार केला.












Click it and Unblock the Notifications