संभाजीनगरात हायव्होल्टेज ड्रामा: शिरसाटांना 'व्हिलन' ठरवत शिवसेना जिल्हाप्रमुखांची तडकाफडकी माघार!
Shivsena High-Voltage Drama in Sambhajinagar : महापालिका रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीमध्ये मोठी ठिणगी पडली आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या असंतोषामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जंजाळ यांनी घेतलेला हा पवित्रा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

प्रचार कार्यालयातून 'नाराजीनाट्याला' सुरुवात
सोमवारी दुपारपासून शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिला जिल्हाप्रमुख शारदा घुले यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याचे समजताच त्यांनी आपल्या समर्थकांसह कार्यालयातच ठिय्या दिला.
"जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही," असा आक्रमक पवित्रा महिला पदाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
"जिंकणाऱ्या जागाच सोडल्या"; जंजाळ यांचा घरचा आहेर
कार्यकर्त्यांची नाराजी आणि जागावाटपाचा घोळ पाहून राजेंद्र जंजाळ यांनी स्वतः माघार घेण्याची घोषणा केली. ते म्हणाले, ज्या ७ ते ८ जागांवर शिवसेना हमखास निवडून येऊ शकते, अशा जागाच आम्हाला मिळणार नसल्याचे समजते.
जर जिल्हाप्रमुख म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल, तर निवडणुकीत उभे राहण्यात काय अर्थ आहे? माझ्याऐवजी एखाद्या सक्षम आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळावी, म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे."
विशेष म्हणजे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर युतीबाबत महत्त्वाची बैठक सुरू असताना जंजाळ यांनी या बैठकीकडे पाठ फिरवून आपला निषेध नोंदवला.
जैस्वाल यांचा संताप: "युती तोडलेली बरी!"
जिल्हाप्रमुखांच्या पावित्र्याला आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. भाजपवर निशाणा साधताना जैस्वाल आक्रमक झाले. ते म्हणाले, "ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी माझ्या निवडणुकीत घराघरांत जाऊन पोलचिट वाटल्या, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ते सहन करणार नाही. जर भाजप अशा पद्धतीने आमच्या जागा हिसकावून अन्याय करणार असेल, तर मग ही युती तोडलेलीच बरी."
संजय शिरसाटांवर 'व्हिलन'ची छाप?
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री संजय शिरसाट आहेत. कार्यकर्त्यांच्या मते, जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेची बाजू कमकुवत पडल्याने आणि भाजपला हव्या तशा जागा सोडल्या गेल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. जंजाळ यांनी थेट बैठकीवर बहिष्कार टाकल्याने शिरसाट यांच्या नेतृत्वावरच स्वपक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महायुतीसमोर मोठे आव्हान
निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाप्रमुखांनी घेतलेली माघार आणि आमदारांनी दिलेला युती तोडण्याचा इशारा यामुळे महायुतीमध्ये 'बिघाडी' होण्याची दाट शक्यता आहे. आता या नाराजीनाट्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications