बाळासाहेब ठाकरे नावाचा चमत्कार
Balasaheb Thackeray Death Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चमत्कार मानले जाणारे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. व्यंगचित्रकार, मार्मिकचे संपादक, शिवसेनेचे संस्थापक, प्रखर वक्ते, कलासक्त व्यक्तिमत्व आणि मुंबई शहरावर एकहाती हुकूमत गाजवणारी हस्ती अशी बाळासाहेब ठाकरे यांची ओळख आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी नंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली. पण महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही मराठी समाज मनात एक विलक्षण खदखद होती. राज्य मराठी असले तरी राज्याच्या राजधानीवर हुकूमत परप्रांतीयाची होती. सरकारी आस्थापना, उद्योग व्यवसाय परप्रांतीयांच्या हाती केंद्रित झाले होते. त्यामुळे मराठी समाज अस्वस्थ होता. या समाजाला बुलंद आवाज मिळवून दिला तो बाळासाहेब ठाकरे यांनी.

विविध व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या दूरवस्थेकडे लक्षवेधले. ती व्यंगचित्रे मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रात देखील प्रचंड गाजली. बाळासाहेब यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अस्वस्थ तरुणांचे थवेच्या थवे बाळासाहेबांकडे आकर्षित होऊ लागले. या तरुणाईला बाळासाहेबांनी आवाज दिला. महाराष्ट्रात मराठी माणसाचे वर्चस्व हा उद्देश दिला. आणि बघता बघता शिवसेना या संघटनेची स्थापना झाली.
80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण
मराठी माणसाला रोजगार मिळवून देणे, उद्योग व्यवसायात त्याला सहाय्य करणे या उद्देशाने शिवसेनेची स्थापना झाली. प्रचंड मोठ्या चळवळी शिवसेनेने हाती घेतल्या. स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून हजारो तरुण सरकारी नोकरी भरती झाले. बाळासाहेब ठाकरे हे या अशा तरुणांचे श्रद्धास्थान बनले. सामाजिक अंगाने जाणारी शिवसेना हळूहळू राजकीय क्षेत्रात उतरली. 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण हे ध्येय घेऊन बाळासाहेबांचे मोहरे राजकारणात उतरले. छगन भुजबळ, मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर अशी असंख्य नावे शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांच्या सोबत होती. मुंबई आणि ठाणे या शहरात शिवसेनेचा झपाट्याने विस्तार झाला आणि हळूहळू शिवसेनेने महाराष्ट्रभर पंख पसरायला सुरुवात केली.
प्रस्थापितांचे वर्चस्व मोडीत
महाराष्ट्रावर असलेले प्रस्थापित सरंजामी राजकारण्यांचे वर्चस्व ही एक मोठी समस्या होती. विस्थापित तरुणांना राजकारणात कोणतीही संधी नव्हती. ती संधी बाळासाहेब ठाकरे यांनी मिळवून दिली. त्यांच्या एका हाके सरशी हजारो विस्थापित करून शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटले. कोणतीही कौटुंबिक आणि आर्थिक पार्श्वभूमी नसणारे हजारो तरुण स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेत प्रतिनिधी म्हणून निवडून गेले.
शिवसेना नसती तर या शेकडो तरुणांना कधी संधीच मिळाली नसती ही वस्तुस्थिती आहे. एक व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी किंगमेकर पर्यंतचा प्रवास केला. सुरुवातीला ठाणे नंतर मुंबई अशा महापालिका जिंकल्यानंतर 1995 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले त्यात बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वाचा करिष्मा अधिक होता. मंत्रिपदासाठी संधी देतानाही बाळासाहेब ठाकरे यांनी अशाच सामान्य तरुणांना मंत्री केले. मनोहर जोशी हे युतीच्या काळात मुख्यमंत्री होते आणि या कार्यकाळाच्या शेवटच्या सहा महिन्यात नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्रीपदी संधी दिली.
मुद्द्यांवर ठाम
ठाम भूमिका हे बाळासाहेबांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते. एखादी भूमिका घेताना त्यांनी परिणामांची कधीच फिकीर केली नाही. त्या भूमिकेचे बरे वाईट परिणाम सोसायची त्यांची तयारी होती. आणि त्यासाठी ते कोणतीही किंमत मोजत असत. आधी मराठीचा मुद्दा आणि नंतर हिंदुत्व या दोन्ही मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे ठाम राहिले. मात्र राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देताना मराठीच्या मुद्द्याला त्यांनी अधिक प्राधान्य दिले.
शिवसेना-भाजप युती असतानाही भाजपला टोले लगावायची हिम्मत बाळासाहेब ठाकरे करीत असत. अर्थात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन अशा शीर्षस्थ नेत्यांशी त्यांचा चांगला संवाद होता .त्यामुळे शिवसेना भाजपा युती मधील वादविवादाने कधी टोकाचे स्वरूप घेतले नाही. बाळासाहेब हे हजारो शिवसैनिकांसाठी दैवत होते. त्यांच्या एका शब्दासाठी वाटेल ते करण्याची तरुणांची तयारी होती. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांच्या एका चिठ्ठीवर त्यांनी आपलं राजीनामा सादर केला होता. अशा कार्यकर्त्यांच्या फौजांच्या फौजा बाळासाहेबांसाठी सज्ज असायचा.
असामान्य कलाकार आणि व्यक्ती
राजकारणी म्हणून यशस्वी असलेले बाळासाहेब कलाकार आणि व्यक्ती म्हणून देखील तितकेच महान होते. संगीत चित्रपट चित्रकला नाटक साहित्य या विषयावर त्यांचा हातखंडा होता. त्यामुळेच या सर्व क्षेत्रातील नामांकित मंडळी चर्चेसाठी आणि गप्पा मारण्यासाठी बाळासाहेबांच्या घरी जात असे. कोणत्याही क्षेत्रातला यशस्वी माणूस हा बाळासाहेबांकडे गेला नाही असे कधीच घडले नाही. क्रिकेटमध्येही त्यांना रुची होती. खिलाडूवृत्ती हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यामुळेच आपल्यावर टीका करणाऱ्या पत्रकारांशीही ते सहज संवाद साधत असत. बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात होते आणि आहेत. तमिळ चित्रपट सृष्टीचा सुपरस्टार रजनीकांत असो किंवा लता मंगेशकर आणि आशा भोसले, रतन टाटा असो किंवा धीरूभाई अंबानी, दिलीप कुमार असो किंवा अमिताभ बच्चन सर्वांशी बाळासाहेबांचा स्नेह होता.
अमोघ वक्तृत्व
वक्तृत्व ही बाळासाहेब ठाकरे यांना मिळालेली आणखी एक देणगी. ठाकरे शैली बाळासाहेबांनी महाराष्ट्रात आणली. ती त्यांना शोभुन दिसायची. एखाद्या व्यक्तीवर टीका करताना बाळासाहेब कसलाही मुलाहिजा ठेवत नसत. पण त्याच व्यक्तीशी त्यांचे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध असायचे. शरद पवार हे बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय विरोधक. पण दोघांची व्यक्तिगत मैत्री हा महाराष्ट्राच्या राजकारणात आजही अगदी चर्चेचा विषय आहे.
महाराष्ट्राच्या मनावर आजही अधिराज्य असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे आयुष्य ही एक दंतकथा आहे. महाराष्ट्राला मोठा राजकीय वारसा देणाऱ्या, एक संस्कृती देणाऱ्या, आणि चौफेर व्यक्तिमत्व म्हणून आदर्श निर्माण करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.












Click it and Unblock the Notifications